देवबाग गावात विजेची समस्या गंभीर ; ग्रामस्थ उद्या वीज वितरणला धडक देणार
मालवण : पर्यटन गाव असलेल्या देवबाग मध्ये वीज पुरवठ्याबाबत अनेक समस्यांचे निर्माण झाल्या आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार कळवून देखील समस्यांचे निवारण होत नसल्याने देवबाग ग्रामपंचायत व ग्रामस्थ उद्या दि. १३ जून रोजी सकाळी १०.३० वा. मालवणच्या वीज वितरण कंपनी कार्यालयात धडक देणार आहेत, अशी माहिती सरपंच उल्हास तांडेल यांनी दिली आहे.
याबाबतचे निवेदन मालवण पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. देवबाग गावात गेले दोन महिने विजेचा खेळखंडोबा सुरु असून विजेचा दाब कमी जास्त होणे, वीज वाहिन्या तुटणे यासह अन्य वीज समस्या निर्माण होत आहे. वीज समस्या सोडविण्यासाठी व सेवा देण्यास वीज वितरण कंपनी कार्यक्षम नाही असे उल्हास तांडेल यांनी म्हटले आहे. वीज समस्या बाबत देवबाग ग्रामपंचायत व ग्रामस्थ वीज कंपनीला भेट देणार असून ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या आक्रोशाला वीज वितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशाराही उल्हास तांडेल यांनी दिला आहे.