…. अन्यथा शिवसेना (ठाकरे गट) आंदोलन छेडणार ; आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांचा इशारा

कणकवली : राज्यस्तरावर कृषी यांत्रिकीकरण योजना राबिविली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर शेती अवजारे लॉटरी पद्धतीने दिली जात आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्यात ऊस पाचटकुटी यंत्र, भात पेरणी यंत्र या दोन यंत्रांची लॉटरी निघणार आहे. या दोन्ही यंत्रांचा उपयोग कोकण पट्ट्यात केला जात नाही. याऐवजी पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर या यंत्रांची मागणी शेतकऱ्यांमध्ये जास्त आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये कोकण विभागासाठी पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर या यंत्रांची लॉटरी पहिल्या टप्प्यात काढण्यात यावी जून-जुलै महिन्यापर्यंत ही लॉटरी न काढल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला आहे.

कोकणात भात पीक हे प्रमुख पीक असून मोठ्या प्रमाणात भात लागवड केली जाते. कोकणात छोट्या वाफ्यांमद्ये भात बियाण्यांची पेरणी केली जाते त्यासाठी यंत्राचा उपयोग केला जात नाही. मात्र जमीनीची मशागत करण्यासाठी पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या यंत्रांना शेतकऱ्यांची मागणी देखील मोठी आहे. २०२१ ते २०२४ या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडरसाठी शेतकऱ्यांचे ७८५२ अर्ज प्रतीक्षा यादीत आहेत. भात पिकाचा हंगाम सुरु होण्याअगोदर शेतकऱ्यांना पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर मिळाले तर त्याचा उपयोग त्यांना होणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या पहिल्या टप्प्यात घेतलेली ऊस पाचटकुटी यंत्र, भात पेरणी यंत्र या दोन्ही यंत्रांचा वापर राज्यातील इतर भागात केला जातो. मात्र कोकणात या यंत्रांचा वापर होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना आवश्यक असलेली कृषी यंत्रे योग्य वेळी न मिळाल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे जून-जुलै महिन्यापर्यंत पॉवर टिलर आणि पॉवर व्हिडर या यंत्रांची लॉटरी पहिल्या टप्प्यात काढण्यात यावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!