कुडाळ मालवण मतदार संघात उमेदवारी न मिळण्याची खात्री झाल्याने आ. वैभव नाईक वैफल्यग्रस्त…

उमेदवारीसाठी आ. नाईकांच्या तब्बल चार वेळा एकनाथ शिंदे तर चार ते पाच वेळा पालकमंत्र्यांसोबत छुप्या बैठका

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा दावा ; राणे, चव्हाण, केसरकरांशी जुळवून घेतलं तर विधान परिषदेची संधी

मालवण | कुणाल मांजरेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी हल्लाबोल केला आहे. आता वैभव नाईकांना अंदाज आला कि छुपे भेटून काही होणार नाही म्हणून या कार्यक्रमाने ते सैरभैर झाले आहेत. कुडाळ मतदार संघात कोणत्याही परिस्थिती उमेदवारी मिळणार याची पक्की खात्री झाल्यानेच वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त बनल्याचे प्रत्युत्तर श्री. चिंदरकर यांनी दिले आहे.

तब्बल चारवेळा छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना तर चार ते पाच वेळा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना भेटून सुद्दा मालवण कुडाळ मतदार संघातून उमेदवारीचा शब्द त्यांना कोणीही दिला नाही. उलट पक्षी आजच्या कार्यक्रमाने आपली उरली सुरली आशा संपल्याचे लक्षात आल्याने वैभव नाईक चिडचिड करायला लागले आहेत. खरंतर आता भाजपचा उमेदवार कोण असणार याचे सुद्धा स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

वैभव नाईक यांना पुन्हा आमदार व्हावंसं वाटत असेल आणि या जिल्ह्याचा शाश्वत विकास व्हावा असं मनापासून वाटत असेल तर त्यांनी नारायण राणे साहेब, रविंद्र चव्हाण आणि दीपक केसरकर यांच्याशी जुळवून घेतलं तर राणेसाहेब मोठ्या मनाने माफ करतील आणि विधान परिषदेसाठी वरील तिघांनी ठरवलं तर आमदार म्हणून परत संधी मिळेल आणि यातच त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं हित आहे. आता मालवण कुडाळ मतदार संघातून विधानसभेसाठी निलेश राणे हे नावं फिक्स आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते सक्षम आहेत. फक्त एवढ्या तरुण वयात नाईकांची राजकीय एक्झिट नकॊ म्हणून हा प्रयोग करायला हरकत नाही. भविष्यात अनेक उबाठा कार्यकर्ते काही भाजपवासी तर काही शिवसैनिक (शिंदे गट ) होतील म्हणून वैभव नाईक सुज्ञ आहेत ते लवकरच योग्य निर्णय घेतील आणि त्यांचं स्वागत असेल, असं धोंडू चिंदरकर यांनी म्हटलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!