कणकवलीत वीज वितरणचा कंत्राटी कर्मचारी वीजेच्या पोलावरून पडून जखमी
अपघाताची माहिती मिळताच कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांची कणकवलीकडे धाव ; जखमी कर्मचाऱ्याची केली विचारपूस
कणकवली : विज वितरणचे कंत्राटी कर्मचारी रामचंद्र सांगवेकर हे विद्युत खांबावरून पडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेचे वृत्त समजताच कंत्राटी कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कर्मचाऱ्याची भेट घेतली. तसेच नातेवाईकांना धीर दिला.
विज वितरणचे कंत्राटी कर्मचारी विद्युत खांबावरून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी कुडाळ येथे शासकीय विश्रामगृह येथे कामगार नेते अशोक सावंत यांनी बैठक घेतली होती. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते. त्याचवेळी कणकवलीत कर्मचारी विद्युत खांबावरून पडून जखमी झाल्याची माहिती मिळाली. यावेळी क्षणाची विलंब न लावता अशोक सावंत यांनी कणकवलीत धाव घेतली. त्या कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्री. सावंत यांनी रुग्णालयात जाऊन त्याच्या तब्बेतीची विचारपूस करत नातेवाईकांना धीर दिला. तसेच उपचाराबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी सांगवे गावातील ग्रामस्थ आणि कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.