पर्यटन व्यवसायिकांची मालवणच्या वीज वितरण कार्यालयावर धडक

अधिकाऱ्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा ; तात्काळ समस्या सोडवण्याची मागणी

मालवण : कमी दाबाचा वीजपुरवठा, सतत खंडित होणारा वीजपुरवठा यासह अन्य वीज समस्यांमुळे देवबाग, तारकर्ली, वायरी येथील पर्यटन व्यावसायिक त्रस्त बनले आहेत. याप्रश्नी वीज वितरणच्या माध्यमातून तात्काळ उपाययोजना न झाल्यास पर्यटन व्यावसायिकांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. असा इशारा पर्यटन व्यावसायिकांच्या वतीने मालवण वीज अधिकाऱ्यांना सोमवारी देण्यात आला.

तीनही गावात मिळून सर्वात जास्त कमर्शियल वीज ग्राहक आहेत. असे असताना येथे अधिक सेवासुविधा मिळणे गरजेचे असताना तसे होत नाही. २४ तास कर्मचारी सेवाही मिळत नाही. ट्रान्सफर्मर उभारणी गरजेची आहे त्याबाबतही उपाययोजना होत नाहीत. पर्यटन केंद्र असलेल्या ठिकाणी ही स्थिती आहे. याचा मोठा परिणाम पर्यटनावर होत आहे. याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात. अन्यथा वीजबिल न भरण्याबाबत एकमुखी निर्णय पर्यटन व्यावसायिकांना घ्यावा लागेल. अशी संतप्त भूमिका पर्यटन व्यावसायिकांनी मांडली.

दरम्यान याबाबत वरिष्ठांशी बोलून कार्यवाही केली जाईल. असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी पर्यटन व्यवसायिक महासंघ जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, रवींद्र खानोलकर, मिलिंद झाड, दादा वेंगुर्लेकर, बाळू मुंडये, अभय पाटकर, तुळशीदास, कोयंडे, दर्शन वेंगुर्लेकर, मुन्ना झाड, शिवा माडये उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!