हे गणराया … कोकणी माणसाला नैसर्गिक संकटापासून दूर कर !
माजी केंद्रीयमंत्री खा. सुरेश प्रभू यांचं गणराया चरणी साकडं
कुणाल मांजरेकर
मालवण : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांनी मालवण मेढा येथील आपल्या निवासस्थानी दीड दिवसांच्या गणरायाचे भक्तिभावाने पूजन केलं. कोकणावर अलीकडे सातत्याने नैसर्गिक संकटे घाला घालत आहेत. सातत्याने होणाऱ्या या नुकसानीमुळे कोकणी माणसाचं कंबरडं मोडून गेलंय. त्यामुळे हे गणराया आमच्या कोकणाला नैसर्गिक संकटा पासून दूर ठेव, असं साकडं सुरेश प्रभुंनी श्री गणेशाला घातलं आहे.
मालवण मेढा येथील निवासस्थानी खा. सुरेश प्रभू दरवर्षी गणेश चतुर्थी मध्ये गणेशाचे भक्तिभावाने पूजन करतात. मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे त्यांना मालवण मध्ये येणं शक्य झालं नव्हतं. मात्र यंदा दरवर्षी प्रमाणे त्यांनी सहकुटुंब मालवण येथील निवासस्थानी श्री गणेशाचे पूजन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोकणात गेले काही वर्षे सातत्यानेनैसर्गिक आपत्ती येत आहे. कोकणी माणूस गरीब असो की श्रीमंत, नियमित पणे श्री गणेशाची आराधना करीत असतो. श्री गणराया देखील या सर्वांवर आपली कृपादृष्टी ठेवत असतो. अलीकडे सातत्याने कोकणात नैसर्गिक आपत्ती येत असून यांमुळे कोकणी माणसाचे कंबरडे मोडून गेले आहे. त्यामुळे नियमित येणाऱ्या नैसर्गिक संकटापासून आमच्या कोकणला दूर ठेव असं साकडं आपण गणेशाच्या चरणी घातल्याचं सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे.