… अन्यथा वीजेच्या खांबावर एलईडी बल्ब ऐवजी ट्यूब लाईट लावू !

मालवण शहरातील बंद स्ट्रीटलाईट वरून युवक काँग्रेसचा इशारा

पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर ; नवीन वीज पोलावरील स्ट्रीट लाईट बंद असणे खेदजनक

कुणाल मांजरेकर

मालवण : गणेशोत्सव दोन दिवसांवर आला असताना मालवण शहरातील स्ट्रीट लाईट बंद आहेत. तसेच शहरातील रस्त्यांवर छोटे मोठे खड्डे असल्याने नागरिकांना चालताना व गणपतीची मूर्ती घरी नेताना त्रास होणार आहे. येत्या दोन दिवसात मालवणातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात, अन्यथा राष्ट्रीय युवक काँग्रेस कडून मालवण शहरातील वीजेच्या खांबावर ट्यूब लाईट लावल्या जातील असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.


याबाबत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी अरविंद मोंडकर यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हा सचिव महेश उर्फ बाळू अंधारी, युवक काँग्रेस विधानसभा मतदार संघ उपाध्यक्ष पल्लवी तारी, शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, शहर उपाध्यक्ष सरदार ताजर, हर्षदा पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेले अनेक महिने मालवण शहरातील स्ट्रीट लाईट बंद असून तौक्ते वादळापूर्वी सुद्धा त्या बंद होत्या. वादळात लाईटचे नवीन पोल उभे केल्यानंतरही स्ट्रीट लाईटचे एल.ई.डी दिवे प्रकाशित न होणे ही अत्यंत खेदजन्य बाब आहे. मालवण नगरपरिषदेच्यावतीने स्ट्रीट लाईट दुरुस्ती देखभाल करण्यासाठी लाखो रुपये ठेकेदाराला दिले जातात. तरीही स्ट्रीट लाईट सुरू होत नसेल तर ठेकेदारावर शासनाची फसवणूक केल्याबाबत व नागरिकांची गैरसोयी केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा. तसेच या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून त्यास उर्वरित बिल देण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी केली आहे

मालवण नगरपालिका नागरिकांकडून पथदीप कर घेत असतानाही स्ट्रीट लाईट बंद असतील तर शहरवासीय सुचवतील त्या ठिकाणच्या स्ट्रीट लाईटच्या खांबावर राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट लावू. त्याबाबत काही अपघात अथवा कायदेशीर बाब निर्माण झाल्यास नगरपरिषद प्रशासन त्यास जबाबदार असेल असा इशाराही अरविंद मोंडकर यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!