देवेंद्र फडणवीस यांची आजची सभा “ऐतिहासिक” आणि “रेकॉर्ड ब्रेक” होणार !
तब्बल ५०० लोकप्रतिनिधी एकाच वेळी व्यासपीठावर विराजमान होणार
सिंधुदुर्ग जिल्हा विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार ; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा विश्वास
आंगणेवाडी | कुणाल मांजरेकर
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसह खरेदी विक्री संघांच्या निवडणुकीत भाजपाने नेत्रदीपक यश मिळवले आहे. यांचा आनंद साजरा करण्यासाठी आंगणेवाडी यात्रौत्सवाचे औचित्य साधून भाजपाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंगणेवाडी – भोगलेवाडीच्या माळरानावर शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता भाजपचा आनंद मेळावा साजरा होत आहे. या मेळाव्यासाठी आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले असून एकाच वेळी ५०० लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मान्यवर नेत्यांसह व्यासपीठावर विराजमान होण्याची कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना असेल. या मेळाव्याला किमान ५० हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या निमित्ताने जिल्हा विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यामुळे हा मेळावा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि रेकॉर्ड ब्रेक होईल. आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपा शतप्रतिशत भाजपा करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आंगणेवाडी येथील भाजपच्या नियोजित मेळाव्याठिकाणी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, महेश मांजरेकर, अशोक तोडणकर आदी उपस्थित होते. यावेळी राजन तेली म्हणाले, भाजपचा हा मेळावा रेकॉर्ड ब्रेक मेळावा होणार आहे. आणि त्याचे रेकॉर्ड फक्त भाजपच मोडू शकेल. भाजपचा सर्वसामान्य लोकप्रतिनिधीही आमच्या नेत्यांच्यासोबत व्यासपिठावर बसून आनंद सोहळ्यात सहभागी होणार असल्याने एक आगळावेगळा ऐतिहासिक मेळावा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना एक नविन उर्जा देणारे ठरणार आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या संकल्पनेतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा भाजपचा आनंदोत्सव मेळावा होत आहे. जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने दोन वर्षात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, जिल्हयात भरीव काम होण्यासाठी येथे येणाऱ्या मंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे तसेच आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, नीतेश राणे यांच्यासह अनेक नेते, मंत्री आंगणेवाडी येथे येत आहेत. जिल्ह्यातील सुमारे ३०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच सध्या कार्यरत आहेत तसेच अनेक नगरपंचायती, जिल्हा बँक, खरेदी-विक्री संघ, अर्बन बँक यावर सुद्धा भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे येथे पार्लमेंट टू पंचायत’ ही संकल्पना पूर्ण करण्यात आली आहे. यावेळी आम्ही पूर्ण शक्तीने मान्यवरांचे स्वागत करणार आहोत, असेही तेली यांनी स्पष्ट केले. सी वर्ल्ड, नाणार प्रकल्प, आडाळी एमआयडीसी या प्रकल्पांना चालना मिळणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावे, यासाठी मागणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आई भराडीचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याने त्यांचेही स्वागत येथे करण्यात येणार आहे.
भाविकांना कोणताही त्रास होणार नाही
या मेळाव्याचा यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, असे राजन तेली यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच केंद्र सरकारच्या अनेक योजना यासह केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंच्या माध्यमातून २०० कोटी रुपयांचे ट्रेनिंग सेंटर जिल्ह्यात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून योजना थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. जिल्ह्यातील जनतेच्यावतीने भाजपचे आभार मानावेत, यासाठी देवीच्या साक्षीने व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करताना भाविक किंवा यात्रा परिसरात कोणाला त्रास होणार नाही, याची कार्यकर्ते काळजी घेणार आहेत, असेही ते म्हणाले.