आ. वैभव नाईकांच्या प्रयत्नांतून किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवरायांचे भव्य सिंहासन !

आ. नाईक यांनी केली पाहणी : खास दगडाचा वापर ; दोन- तीन दिवसात काम पूर्ण होणार

मालवण | कुणाल मांजरेकर

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या विशेष निधीतून किल्ले सिंधुदुर्ग वरील शिवराजेश्वर मंदिरात भव्य सिंहासन साकारण्यात येत आहे. सिंहासनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान, आ. वैभव नाईक यांनी शुक्रवारी सायंकाळी येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. मंदिराचे काम देखील तातडीने सुरु होणार असून किल्ल्यावर पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मंदिराचे विश्वस्त सयाजी सकपाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, वायरी भूतनथ सरपंच भगवान लुडबे, सिद्धेश मांजरेकर, सन्मेष परब, दत्ता पोईपकर, अनंत पाटकर यांच्यासह अन्य शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते. या सिंहासनाचे काम कोल्हापूर येथील अशोक सुतार आणि कारागीर करीत आहेत. त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली असून कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील नवीन मूर्ती त्यांनी साकारली आहे.

यावेळी बोलताना आ. वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. त्यामुळे हे ठिकाण तमाम शिवप्रेमींसाठी आदराचे स्थान आहे. हे सिंहासन साकारताना पुरातत्व विभागाच्या अनेक अडचणी होत्या. त्यामुळे हे काम रखडले होते. मात्र या अडचणींवर मात करून हे सिंहासन साकारण्यात येत आहे. मंदिराची फरशी बसवणे आणि अन्य काम देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल. सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी नवीन जेटी मंजूर झाली आहे. त्याचे टेंडर निघाले असून या कामाला देखील लवकरच सुरुवात होणार आहे.

“या” कामांवरील स्थगिती लवकरच उठेल ; आ. नाईकांचा विश्वास

किल्ल्यावरील लाईट आणि पाण्याच्या सुविधेसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र या कामाला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या नियोजनच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे ही स्थगिती उठवण्या साठी मी मागणी केली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. हे मंदिर सर्वांचे आदर स्थान आहे. त्यामुळे या कामावरील स्थगिती उठेल, असा विश्वास आ. नाईक यांनी व्यक्त केला. सरसंघचालक मोहन भागवत हे किल्ल्यावर येणार आहेत, त्यांचेही याकडे किल्ला रहिवासी लक्ष वेधतील, असेही ते म्हणाले. किल्ल्यावर लाईट शो उभारण्यााठी आपण प्रयत्न करीत असून किल्ल्यावरील स्वच्छतेकडे स्वतः लक्ष देण्याची सुचना सरपंच भगवान लुडबे यांना केली आहे, असे वैभव नाईक म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!