माघी गणेश जयंती निमित्त मालवणात “श्रीं” च्या मूर्तींचे थाटात आगमन
माघी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या स्वागताला पारंपरिक वाद्य ; तर वायरीच्या राजाच्या स्वागताला डीजेचा थरार
मालवण | कुणाल मांजरेकर
माघी गणेश जयंती सोहळा उद्या पासून सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय. यानिमित्ताने मंगळवारी रात्री मालवणात श्रींच्या मूर्तीचे जल्लोषी वातावरणात आगमन झाले. मालवणमध्ये माघी गणेशोत्सव मंडळ आणि कुंभारमाठ मध्ये संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून वायरीचा राजा स्थानपन्न होतो. माघी गणेशाच्या मूर्तीचे पारंपरिक वाद्यांनी तर वायरीच्या राजाचे डीजेच्या तालावर वाजत गाजत आगमन झाले. वायरीच्या राजाच्या आगमनाला म्हापणचे मोर आणि घारीची नृत्य आकर्षण ठरले होते.
मालवण शहरात माघी गणेश चौकात माघी गणेश मंदिरात माघी गणेश जयंती सोहळा साजरा केला जातो. यानिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. येथील गणेशमूर्तीचे सायंकाळी उशिरा पारंपरिक वाद्यांनी आगमन झाले. यावेळी माघी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह भाविक उपस्थित होते.
मालवण शहरालगत कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगणावर संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून अलीकडे मोठ्या उत्साहात माघी गणेश जयंती साजरी करण्यात येते. या गणेशाचे जल्लोषी वातावरणात आगमन झाले. बेंजोच्या तालावर आणि डीजेच्या जल्लोषात येथील “वायरीच्या राजा” चे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत म्हापण येथील कलाकारांनी मोर आणि घारीची वेशभूषा करून केलेल्या नृत्याला नागरिकांनी दाद दिली. यावेळी संजय लुडबे, मंदार लुडबे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन्ही गणेश मुर्त्या बाजारपेठेतील वायंगणकर बंधूंच्या गणेश चित्र शाळेत साकारण्यात आल्या आहेत.
सर्व छायाचित्रे – गणेश गावकर, भरड मालवण