खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईकांनी घेतला आंगणेवाडी जत्रोत्सव पूर्वतयारीचा आढावा !

आंगणेवाडी देऊळवाडा धरणाच्या कामाची लवकरच वर्क ऑर्डर ; जमीन मालकांना मिळणार तब्बल ११ कोटींची नुकसान भरपाई

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे असलेले अरिष्ट दूर होवो ; खा. राऊत यांचे भराडी आई चरणी साकडे

मालवण | कुणाल मांजरेकर

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा येत्या ४ फेब्रुवारीला होत आहे यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी आंगणेवाडीला भेदेऊन ग्रामस्थ मंडळाकडून यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. कोरोना नंतर कोणत्याही निर्बंधाविना ही यात्रा होत आहे. त्यामुळे यंदा यात्रेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल, असा विश्वास व्यक्त करून ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी ग्रामस्थ मंडळाला सर्वातोपरी सहकार्य करण्याची ग्वाही खा. राऊत यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेल्या आंगणेवाडी देऊळवाडा धरणाच्या कामाची लवकरच वर्क ऑर्डर निघणार आहे. भुसंपादनासाठी जमीन मालकांना तब्बल ११ कोटींची नुकसान भरपाई मिळणार असून त्यातील ५० टक्के रक्कम प्रांताधिकाऱ्यांकडे जमा झाली आहे, हे धरण पूर्ण झाल्यानंतर धरणातील पाणी आंगणेवाडी गावात आणणार असल्याचे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी मंगळवारी आंगणेवाडी येथे भेट देऊन भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी यात्रा तयारीची माहिती आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे व पदाधिकारी आंगणे कुटुंबीय यांच्याकडून घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपतालुका प्रमुख अमित भोगले, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, मर्डे उपसरपंच पिंट्या गावकर, बंडू चव्हाण, अरुण लाड, सुभाष धुरी, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, विजय पालव, नंदकिशोर कासले, मुळीक यासह अन्य पदाधिकारी व आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावर्षी यात्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मोठ्या संख्येने भाविक यात्रेस दाखल होणार आहेत. रस्ते, पाणी, वीज पुरवठा, बीएसनल नेटवर्क, आरोग्य सुविधा व अन्य सोई सुविधा मंडळाच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध करून देत असताना काही समस्या असतील तर त्या मंडळ व प्रशासन दूर करत आहे. आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आमच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या मागे असलेले अरिष्ट दूर होवो

आमच्या सर्वांच्या श्रद्धेचे स्थान आंगणेवाडी भराडी देवी आहे. दर वर्षी प्रमाणे महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक भक्तगण व शिवसैनिक आंगणेवाडी यात्रेस येणार आहेत. भराडी मातेने सर्वाना निरोगी दीर्घायुष्य देवो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे असलेले अरिष्ट दूर होवो. अशी प्रार्थना भराडी देवीच्या चरणी करण्यात आली आहे. असेही खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!