सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची गाडी होणार सुपरफास्ट…
जिल्हा विकास आराखड्या संबंधी मुंबईत महत्वाची बैठक संपन्न ; देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंसह दिग्गज उपस्थित
प्रशासनाकडून ३०० कोटींच्या आराखड्याचे सादरीकरण ; आराखडा ३५० ते ४०० कोटींपर्यंत न्या : ना. राणेंची सूचना
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्हा विकास आराखडा संबधी महत्वाची बैठक मुंबई येथे संपन्न झाली. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रशासनाकडून जिल्हा नियोजनचा ३०० कोटींचा आराखडा मांडण्यात आला. दरम्यान, जिल्ह्याचा आराखडा किमान ३५० ते ४०० कोटींपर्यंत बनवण्याची सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या बैठकीत केली आहे.
या बैठकीत सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आ. नितेश राणे, आ. निरंजन डावखरे, आ. वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी खासदार सुधीर सावंत,शिंदे गट जिल्हाध्यक्ष संजय आग्रे आदी उपस्थित होते.
या बैठकीत अधिकाऱ्यांनी ३०० कोटींचा जिल्हा नियोजनचा आराखडा सादर केला. बैठकीत जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करणे तसेच पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पदपडताळणी नियमाप्रमाणे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी शिक्षक भरतीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. तसेच प्रत्येक हायस्कुल मध्ये टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करावी, साकव दुरुस्तीसाठी निधी मिळावा, नवीन घाट रस्त्यांसाठी निधी मिळावा, त्याचप्रमाणे हायस्कुलना इमारत बांधणीसाठी निधी उपलब्ध होत नाही, त्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यात मागील तीन वर्षे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला नाही, यासाठी किमान ८४ कोटींची गरज आहे, हा निधी मिळण्याची मागणी राजन तेली यांनी या बैठकीत केली आहे.