अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरात आता मास्क बंधनकारक ; दर्शनासाठी नियमावली !
कोरोनाच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना!
स्वामी भक्तांनी सहकार्य करावे : देवस्थान समिती अध्यक्ष महेश इंगळे यांचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
पुन्हा एकदा जगावर कोरोना महामारीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे संभाव्य धोक्याचा सामना करण्याच्या उद्देशाने कोरोनाला रोखण्यासाठी पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये याकरिता अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने पूर्णपणे खबरदारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली असून नाताळ आणि थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने दर्शनासाठी नियमावली करण्यात आली आहे. याला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.
शासनाच्या आवाहनास अनुसरून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने मंदिरात आलेल्या सर्व भाविकांना मास्कचे वाटप शुक्रवारी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना इंगळे म्हणाले, दोन वर्षात आपल्याला अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे. पुन्हा जागतिक पातळीवर प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही सूचना केलेल्या आहेत, त्यास अनुसरून मंदिरास येणाऱ्या सर्व स्वामीभक्तांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व स्वामीभक्तांनी मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. या पुढील काळात काही दिवस येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भाविकांना सोशल डिस्टन्सला अनुसरून टप्प्या-टप्प्याने दर्शनास सोडण्याचे नियोजन, मंदिरात प्रवेश करत असताना भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले असून या कामी अमर पाटील यांच्या समीक्षा मेडिकलचे विशेष सहकार्य लाभले आहे. येणाऱ्या सर्व स्वामीभक्तांनी प्रशासनाच्या व मंदिर समितीच्या सूचनांचे पालन वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर करण्याचे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे. आता नाताळ सुट्ट्या व नूतन वर्षाच्या सुरुवातीला होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता हे नियोजन करण्यात आल्याचे इंगळे यांनी सांगितले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मंदार महाराज पुजारी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, अमर पाटील, प्रसाद सोनार, नागनाथ गुंजले आदी उपस्थित होते.