दिलासा : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आता नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करता येणार

राज्य निवडणूक आयुक्त यांचा निर्णय : आ. नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई : ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सर्व्हर डाऊन मुळे वारंवार अडचणी येत असल्याने या निवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी घेतला आहे. याबाबतची माहिती आ. नितेश राणे यांनी दिली आहे.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.

हरी खोबरेकर यांनीही वेधले होते लक्ष

ग्रामपंचायत निवडणुका पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणा प्रक्रिया सुरू आहे. २ डिसेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मोठ्या संख्येने ग्रामपंचायत निवडणुका असल्याने उमेदवार संख्याही जास्त आहे. अर्ज भरणा प्रक्रिया सर्वत्र सुरू आहेत. मात्र सर्वर डाऊन ही समस्या सतत येत असल्याने अनेक उमेदवारांना अर्ज भरणा करताना अडचणी येत आहेत. २ डिसेंबर अर्ज भरणा करण्याची अंतिम मुदत पाहता अनेक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज भरणा करण्याची प्रक्रिया अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा विचार करता उमेदवारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण तहसील दारांकडे केली होती. सर्वपक्षीय तसेच अपक्ष अश्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणा करताना समस्या येत असल्याचे खोबरेकर यांनी निदर्शनास आणून दिले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!