मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३० पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर ; तालुका निहाय आढावा घेणार

सरचिटणीस परशूराम उपरकर यांची माहिती : ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यात नवचैतन्य

कणकवली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. १ आणि २ डिसेंबरला ते तालुकानिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. त्‍यानंतर ते रत्‍नागिरी, रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असल्‍याची माहिती मनसेचे सरचिटणीस परशूराम उपरकर यांनी दिली.

येथील मनसे संपर्क कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मनसे जिल्‍हा उपाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. श्री.उपरकर म्‍हणाले, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी राज ठाकरे कोकण दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा प्रारंभ सिंधुदुर्ग पासून होणार आहे. श्री. ठाकरे हे ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्गात येणार आहेत. तर १ आणि २ डिसेंबरला ते प्रत्‍येक तालुका तसेच प्रत्‍येक मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांशी भेटीगाठी आणि चर्चा करणार आहेत. जिल्ह्यातील पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशीही ते चर्चा करणार असल्‍याचे श्री.उपरकर म्‍हणाले. श्री.ठाकरे यांच्या या दौऱ्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील मनसे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. दरम्‍यान श्री.ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी दोन ते तीन दिवस आधी मुंबई परिसरातील पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात यावे असे आवाहन श्री.उपरकर यांनी केले. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे सिंधुदुर्गातील मनसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर श्री.ठाकरे हे रत्‍नागिरी आणि रायगड जिल्ह्याचाही दौरा करणार असल्‍याची माहिती श्री.उपरकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!