मालवण खरेदी विक्री संघ निवडणूक : शहरी आणि ग्रामीण भागातील मजबूत नेटवर्कमुळे भाजपाचा विजय सोपा !

भाजपा पदाधिकाऱ्यांचा विश्वास ; विजयानंतर जनहित आणि कर्मचाऱ्यांच्या हितालाच प्राधान्य देणार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण खरेदी विक्री संघाची निवडणूक उद्या होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी सहकार विकास पॅनेलने पंधराही जागांवर स्वच्छ आणि पारदर्शक उमेदवार उभे केले आहेत. भाजपचे शहरी आणि ग्रामीण भागातील मजबूत नेटवर्क आणि कामगार नेते दिवंगत सुनील मलये यांचे आशीर्वाद याच्या बळावर आमचे पंधराही उमेदवार बहुमतांनी विजयी होऊन मालवण तालुका खरेदी विक्री संघावर भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब व मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला आहे.

मालवण तालुका भाजप कार्यालयात भाजप पदाधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक दिपक पाटकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, कृष्णा चव्हाण, भाई मांजरेकर, ललीत चव्हाण, महेश सारंग, राजू बिड्ये, निनाद बादेकर, विक्रांत नाईक, बाळा मालवणकर, नारायण लुडबे, कासवकर तसेच अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मालवण या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवार १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होत आहे. संस्थेचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय कै. नाना साहेब ढोलम, तत्कालीन व्यवस्थापक स्व. श्री. दामोदर बळवंत आठले आणि सहकारी यांच्या अथक प्रयत्नातून खरेदी विक्री संघाची स्थापना झाली असून ही संस्था ९४ वर्ष कार्यरत आहे आणि शतक महोत्सवाकडे संस्थेची वाटचाल सुरु आहे.

केंद्रियमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरु असून मालवण तालुक्यातील शेतकरी, मच्छीमार, मजूर, महिला आणि छोटे व्यापारी यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून अत्याधुनिक सिंधुबजार (सूपर मार्केट), शासनमान्य ७ धान्यदुकाने, खत व किटकनाशक विक्री केंद्र, बी-बीयाणे शेतीपूरक अवजारे यांची उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे. त्याकामी तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याशी समन्वय साधून शेतकऱ्यांना शेतीपूरक सुविधा देण्यामध्ये संघ यशस्वीपणे कार्यरत आहे. भारत गॅस विभागाच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे वितरण व्यवस्था करण्यात आलेली आहे. संस्थेच्या सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर संचालक मंडळाने वेळोवेळी सभासद, कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे संस्था यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. गेल्या सात वर्षांत कार्यरत असणारे संस्था अध्यक्ष आबा हडकर यांनी सभासदांच्या हितासाठी आणि संस्थेच्या भल्यासाठी अनेक योजना राबवून त्याचा थेट फायदा सर्वांना झालेला आहे, असेही यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले.

भाजप पुरस्कृत उमेदवारांचे प्राबल्य पाहता महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपल्या संस्था गटातील उमेदवारांचा प्रचार सोडून आल्याचे चित्र आहे. आघाडीच्या उमेदवारांसोबत संस्था गटातील उमेदवारही दिसून येत नाहीत. यामुळे संस्था गटातील सहाच्या सहा जागा भाजप एकतर्फी जिंकून उर्वरीत सर्वच्या सर्व ९ जागांवर भाजप पुरस्कृत उमेदवार मोठ्या विक्रमी मतांनी विजयी होतील, असा ठाम विश्वास सुदेश आचरेकर, बाबा परब यांनी व्यक्त केला आहे.

कै. सुनील मलये यांचा आशीर्वाद पाठीशी

भाजपा पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांच्या पाठीशी कै. सुनील मलयेंचा आशिर्वाद आहे. कै. सुनील मलये यांनी खरेदी विक्री संघाच्या हितासाठीही नेहमी प्रयत्न केलेले आहेत. ते संघाचे रेशन दुकान चालवित होते. एक आदर्श व्यक्तीमत्व असलेल्या सुनील मलये यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांना मानणाऱ्या वर्गातील काही व्यक्ती उमेदवार म्हणून भाजप सोबत जोडले गेले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर व सहकारी यांनी जनतेला अपेक्षित असे उमेदवार दिले. त्यामुळे विजयानंतर जनहिताचेच, कामगार हिताचे, सभासद ग्राहक हिताचे व संस्था प्रगतीचे निर्णय दिसून येतील, असा शब्द त्यांनी दिला आहे.

तब्बल १.६२ कोटींचा इमारत निधी

गेल्या सात वर्षात संस्थेच्या आर्थिक विकासात मोठी वाढ झाली. संस्थेच्या इमारत निधीमध्ये ५६ लाखाची वाढ झाली. आज रोजी १ कोटी ६२ हजार एवढा इमारत निधी संस्थेकडे जमा आहे. आगामी काळात केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे नवीन व्यापारी संकुल, पर्यटन संकूल उभारण्याचे निश्चित केले असून त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्याचे काम सुरु आहे. भारतीय जनता पार्टी, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सहकाराला एक आशादायक दिशा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.

भाजपा पुरस्कृत पॅनेल मधून निवडणुकीत उभे असलेले उमेदवार सहकारात काम केलेले अनुभवी व सुशिक्षीत असेच आहेत. १५ उमेदवारांमध्ये महेश बाळकृष्ण मांजरेकर, कृष्णा पांडुरंग चव्हाण, राजन जगन्नाथ गांवकर, प्रफुल्ल वासुदेव प्रभू अभय सखाराम प्रभुदेसाई, राजेंद्र नारायण प्रभुदेसाई, विजय वसंत ढोलम, महेश लक्ष्मण गांवकर, गोविंद बाळकृष्ण गावडे, रमेश बापू हडकर, सुरेश ज्ञानदेव चौकेकर, कृष्णा हरिश्चंद्र ढोलम, अशोक लाडोबा तोडणकर, सरोज शिवाजी परब, अमृता अशोक सावंत यांचा समावेश आहे. सर्वच्या सर्व जागांवर आमचाच विजयी होईल असा विश्वास बाबा परब,सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!