रामेश्वर सोसायटीत “परिवर्तन” ; ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा सुफडा साफ

दांडेश्वर परिवर्तन पॅनलचे एकहाती वर्चस्व ; ११ ही जागा ताब्यात ; बिनविरोध झालेल्या २ जागांच तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या वाट्याला

जिल्हा बँकेचे संचालक मेघनाद धुरी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर यांना पराभवाचा धक्का

मालवण | कुणाल मांजरेकर

किनारपट्टी भागात प्रतिष्ठेच्या केलेल्या रामेश्वर मच्छीमार सहकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत तरुणांच्या दांडेश्वर परिवर्तन पॅनलने सत्ताधाऱ्यांचा सुफडा साफ करीत या सोसायटीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेविका सौ. दर्शना कासवकर यांना याठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले. सोसायटीच्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक झाली. यामध्ये सर्वच्या सर्व ११ ही जागांवर परिवर्तन पॅनलने बाजी मारली आहे. त्यामुळे बिनबिरोध झालेल्या २ जागांवरच सत्ताधाऱ्यांना समाधान मानावे लागले. या विजयानंतर श्रमिक मच्छिमार व पारंपारिक मच्छीमारांनी एकच जल्लोष करीत जोरदार घोषणाबाजी केली. दांडेश्वर दर्यावर्दी परिवर्तन पॅनलचे प्रमुख अन्वय प्रभू, रश्मीन रोगे व सर्व सहकारी यांचा करिश्मा या निवडणुकीत दिसून आला.

दांडी येथील श्री रामेश्वर मच्छीमारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवड गेली २५ वर्षे बिनविरोध होत असताना यावर्षी प्रथमच निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पारंपारिक मच्छीमारांनी एकजूट दाखवत सत्ताधारी पॅनल विरोधात आपले पॅनल उभे केले. दांडी प्राथमिक शाळेत झालेल्या या निवडणुकीत दिवसभरात मतदान प्रक्रिया पार पडल्यावर सायंकाळी मतमोजणी पार पडली. या दरम्यान मतदान केंद्राबाहेर मच्छीमारांनी मोठी गर्दी केली होती.

संस्थेच्या एकूण १३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. या दोन जागांवर मेघनाद धुरी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनलचे दत्ताराम माणगावकर व रुपेश साळगावकर यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे ११ जागांसाठी दोन पॅनल मध्ये थेट लढत होती. सर्व अकरा जागांवर दांडेश्वर दर्यावर्दी पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने या निवडणुकीत दर्यावर्दी पॅनलने एकतर्फी वर्चस्व मिळवले.

क्रियाशील सर्वसाधारण सभासद प्रतिनिधी मतदार संघातून संतोष रामचंद्र ढोके, जीवन महादेव भगत, हेमंत विजाऊ जोशी, प्रवीण महादेव मेस्त, तुषार शिवा आचरेकर, पंकज श्रीरंग सादये, रवींद्र सदाशिव चांदेरकर, दिलीप प्रमोद पराडकर, महिला मतदार संघातून अर्चना अजित आचरेकर, मृणाली महेंद्र कोयंडे व भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग मधून जगदीश एकनाथ खराडे हे विजयी झाले.

सहकार विभाग अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. यासाठी श्रीकृष्ण मयेकर, प्रेमानंद जाधव, राजन आरोंदेकर, प्रशांत शिर्सेकर, विलास सावंत, गंगाराम सावंत, शिवप्रसाद चौकेकर, अतुल मालंडकर, राधिका हळदणकर, सान्वी शेट्ये, नम्रता साळकर, योगेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

या विजयानंतर पारंपारिक मच्छीमारांनी जोरदार जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली. श्रमिक मच्छीमारांचा विजय असो अशा घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. दांडेश्वर दर्यावर्दी परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख अन्वय प्रभू, रश्मीन रोगे, श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, दिलीप घारे, बाबी जोगी, भाऊ मोर्जे, रुपेश प्रभू आदी व इतर उपस्थित होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी उपस्थित राहून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

धुरी, कासवकर यांना पराभवाचा धक्का

निवडणुकीत सत्ताधारी गटाचे पॅनेल प्रमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष, मच्छिमार सोसायटी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्यांच्या पॅनेलचे अन्य १० उमेदवारही पराभूत झाले. यात मालवण नगरपालिकेत चार वेळा नगरसेविका राहिलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या दर्शना कासवकर यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!