मालवणच्या ग्रामदैवतांचा ७ नोव्हेंबरला दीपोत्सव
श्री देव नारायणाच्या जत्रोत्सवाचेही आयोजन ; भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन
मालवण : मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव सोमवार दि. ७ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दीपोत्सव दिवशी दुपारी समाराधना, रात्रौ ९.३० वाजता पुराणवाचन सांगता, त्यानंतर मंदिर व मंदिराच्या कळसावर कोहाळ्याचे दिवे करुन श्री देवनारायण, श्री देवी पावणाई, श्री देवी भावई, श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी या पाचही मंदिरांवर दिप लावून दीपोत्सव साजरा होणार आहे. व त्यानंतर पालखी प्रदक्षिणा व मिरवणूक होणार असून श्री देव रामेश्वर एकरात्र श्री देव नारायण भेटीस थांबतो. रात्री १२.०० वाजता गोरे दशावतारी मंडळाचे नाटक व पहाटे दहीहंडी व त्या नंतर प्रथेनुसार देव स्नान साठी पालखी कवटकर पुला जवळ जातो. तेथे ब्राह्मण हस्ते स्नान पूजा होते व त्यानंतर श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण पालखी श्री देव रामेश्वर मंदिरकडे मार्गस्थ होतात. या कार्यक्रमाला प्रथेनुसार रात्री ९ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन शिवाजी महाराजांच्या राजदंड (चांदिचा) या उत्सवाला किल्ल्यावरील मानकरी वाजत गाजत किल्ल्यावरुन घेऊन येतात व ते उत्सव समाप्तीनंतर सकाळी मानाचे श्रीफळ (प्रसाद) घेऊन मार्गस्थ होतात. तरी या उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.