अमित खोत : मालवणच्या पत्रकारितेतील “ब्रँड”
कुणाल मांजरेकर
श्रीकृष्ण उर्फ अमित खोत… सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील एक होतकरू तरुण… व्यापारी कुटुंबात जन्माला आलेल्या अमित याला महाविद्यालयीन जीवनात नाट्य आणि कला क्षेत्राची फार आवड. कॉलेज संपल्यानंतर स्वतःच्या उदर निर्वाहाचं साधन म्हणून गिफ्ट आणि मोबाईलचं दुकान थाटणारा अमित २०११ साली नकळतपणे पत्रकारितेत आला. आणि बघता बघता मालवणच्या पत्रकारितेचा ब्रँड कधी बनला, ते कुणाला कळलंच नाही. सदैव हसरा चेहरा आणि परोपकारी वृत्ती हे वैशिष्ट्य असलेल्या अमित याचा आज ३ नोव्हेंबर ला ३८ वा वाढदिवस …
अमित याचं कुटुंब खरं तर व्यावसायिक. बाजारपेठेत त्याच्या कुटुंबाचं कपड्याचं दुकान होतं. आजोबा आणि वडील हा पारंपरिक व्यवसाय सांभाळत. आपलं शालेय शिक्षण टोपीवाला हायस्कुल मध्ये पूर्ण केल्यानंतर अमित याने मालवण येथील सिंधुदुर्ग कॉलेज मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. महाविद्यालयात असताना सांस्कृतिक कार्यक्रमाची फार आवड असल्याने कॉलेज जीवनात स्किट आणि नाटकाच्या माध्यमातून अमित याने स्टेज वर पहिल पदार्पण केलं. कॉलेज मध्ये विद्यापीठ स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी त्याला मिळाली. नाटक सादर करताना लेखन करण्याची सवय देखील त्याला जडली होती. त्यामुळे काही नाटिकेंचं लेखन देखील त्याने केलं. त्यातून महाविद्यालयीन स्तरावर त्याचे अनेक कार्यक्रम गाजले.
कॉलेज संपल्यानंतर सर्वसामान्यपणे स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने बाजारात गिफ्ट गॅलरी सुरु केली. तसेच अमितची आई प्रचंड मेहनती. घरात खानावळ चालवण्याच्या तिच्या व्यवसायात देखील त्याने लक्ष दिला. मात्र या व्यवसायात तो फार काळ रमला नाही. सुरुवाती पासूनच वाचन आणि लेखनाची आवड असल्याने तो नकळतपणे पत्रकारितेकडे वळला. आमच्या मालवणात कोणाला पत्रकार म्हणून घडायचं असेल तर पत्रकारांची एकमेव फॅक्टरी म्हणजे आमच्या प्रफुल्ल देसाई यांचं रत्नागिरी टाइम्स कार्यालय. असं आम्ही गंमतीने म्हणतो. यामध्ये गंमत असली तरी हे वास्तव देखील तेवढंच खरं देखील आहे. या पत्रकारितेच्या फॅक्टरी मध्ये अमित ने प्रवेश घेतला. अन् बघता बघता पत्रकार म्हणून तो नावारूपाला आला. रत्नागिरी टाइम्स नंतर पुण्यनगरी, सिंधुदुर्ग समाचार, सामना यांसारख्या दैनिकांमध्ये काम केल्यानंतर डिजिटल मीडियात त्याने पदार्पण केलं. आज आपला कोकण लाईव्ह या चॅनेल मध्ये ब्युरो चीफ तसेच दै. प्रहार मध्ये मालवण तालुका प्रतिनिधी म्हणून देखील तो कार्यरत आहे. तसेच मालवण तालुका पत्रकार समितीच्या विविध पदांवर तो काम करीत आहे.
पत्रकारिता करत असतानाच सामाजिक क्षेत्रात देखील अमित याचं योगदान विसरता येणार नाही. दोन वर्षांपूर्वी कोरोनाने हाहाकार उडवला असताना पोलीस, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून अमित याने काम केलं. त्याच्या या कार्याची पालिका प्रशासनाकडून दखल देखील घेण्यात आली.
पत्रकारितेत काम करताना अनेक राजकीय आणि सामाजिक जीवनात अनेकांशी त्याचा संबंध आला. त्यातून अनेक मित्र जोडले गेले. पत्रकारितेत आज अमित याचं नाव एक ब्रँड बनलं आहे. अमित याची बहीण मुंबई पोलीस दलात कार्यरत असून पत्नी सौ. शुभांगी लोकरे – खोत कुडाळ मधील बॅरिस्टर नाथ पै इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये प्रिन्सिपल म्हणून सेवा बजावते. आजही आपल्या पत्रकारितेच्या जीवनात गुरूंचं स्थान प्रफुल्ल देसाई यांना असल्याचं तो अभिमानाने सांगतो. आपण जोडलेली माणस हीच आपली खरी संपत्ती आहे. यापुढे देखील माणसे जोडणे आणि माणसे कमवणे हेच आपलं उद्दिष्ठ असून यातून एक प्रकारचं आत्मिक समाधान मिळत, अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.