स्वच्छता लीग मधील सन्मान म्हणजे पालिका प्रशासन आणि शहर वासियांच्या एकतेचे फलित !
दीपक पाटकर यांची प्रतिक्रिया : मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह प्रशासन आणि नागरिकांचे अभिनंदन
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्रशासनाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मालवण नगरपरिषदेचा शुक्रवारी देशपातळीवर विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह पालिका प्रशासन आणि शहरातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
या अभियानात मालवण शहर वासियांनी एक मिशन समजून हिरीरीने सहभाग घेतला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. प्रशासनाने देखील मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या नेतृत्वाखाली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळेच हे यश मिळाले असून आगामी कालावधीत देखील शहर स्वच्छ ठेऊन देश आणि राज्य पातळीवर यश प्राप्त करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन दीपक पाटकर यांनी केले आहे.