सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या “त्या” वक्तव्याचा मालवणात शिवसेनेकडून निषेध
बेताल वक्तव्ये बंद करा, अन्यथा राज्यात फिरणे मुश्कील होईल : तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा
मालवण : मी भिकारी होण्यापेक्षा महाराष्ट्राला भिकारी करेन असे वक्तव्य करणाऱ्या सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी निषेध करण्यात आला. येत्या काळात राज्यातील जनताच सावंत यांना भिकारी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा शब्दांत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांच्यावर टीका केली.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल मी भिकारी होण्यापेक्षा महाराष्ट्राला भिकारी बनवेन असे वक्तव्य केले होते. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. यात तालुका शिवसेनेच्या वतीने येथील शिवसेना शाखेसमोर तानाजी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी बोलताना श्री. खोबरेकर म्हणाले, तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यातून अपप्रवृत्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. तानाजी सावंत सारख्या गद्दारांनी शिंदे गटात गेल्यावर त्यांची एकच मनीषा दिसून येते की आमच्या महाराष्ट्राला कसे खाली नेता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आरोग्यमंत्र्यांना हाफकिन माहिती नाही त्यावरून त्यांचे अज्ञान दिसून येते. त्यांनी जे वक्तव्य केले त्याचा जाहीर निषेध करतानाच यापुढे त्यांची अशी वक्तव्ये सहन करणार नाही. सावंत यांना राज्यात फिरणे मुश्कील होईल. येत्या काळात राज्यातील जनताच त्यांना भिकारी केल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील आताचे सरकार हे महाराष्ट्र द्वेषी सरकार असून जनतेने जागरूक राहून त्यांना धडा शिकविणे गरजेचे बनले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपातालुका प्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, सन्मेष परब, दीपक देसाई, प्रसाद चव्हाण, गौरव वेर्लेकर, आतु फर्नांडिस, मनोज मोंडकर, अक्षय भोसले, दत्ता पोईपकर, सुरेश माडये, किशोर गावकर आदी उपस्थित होते.