ठेकेदारांचं तुम्ही बघून घ्या ; पण गणेश चतुर्थीपूर्वी सर्व रस्ते सुरळीत झालेच पाहिजेत …

अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार : खड्डेमय रस्त्यांप्रश्नी शिवसेनेचा मालवणात सा. बां. ला इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील वर्क ऑर्डर झालेले काही रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. तर काही ठिकाणी ठेकेदाराने कामही सुरू केलेले नाही. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असताना खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांची तीव्र गैरसोय होणार आहे. त्यामुळे ठेकेदारांचे काय करायचे आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहावे, गणेश चतुर्थी पर्यंत कोणत्याही परिस्थितीत खड्डेमय रस्ते सुस्थितीत झाले पाहिजेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे आणि तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांची सोमवारी भेट घेऊन खड्डेमय रस्त्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी नगरसेवक पंकज सादये, संदेश तळगावकर, प्रसाद आडवलकर, करण खडपे, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारने येथील रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधीचा निधी दिला. मात्र यातील काही कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. काही ठेकेदारांनी निधी उपलब्ध असतानाही कामे केलेली नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना नाहक नागरिकांच्या सामोरे जावे लागते. गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असून तत्पूर्वी या सर्व रस्त्यांची डागडुजी न झाल्यास गणेश मुर्त्या नेताना भाविकांची गैरसोय होणार आहे, असे हरी खोबरेकर यांनी निदर्शनास आणून दिले. वायरी तारकर्ली देवबाग मार्गावरील शिवाजी पुतळ्यानजीकच्या रस्त्याचा काही भाग अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. असेच याच मार्गावर तारकर्ली रांजनाल्यावर बांधलेल्या पुलानजीकचा जोडरस्ता देखील खड्डेमय बनला असून या ठिकाणहून ग्रामस्थांनी गणेश मूर्ती कशा आणाव्यात ? असा सवाल त्यांनी केला. सिद्धेश्वर मंदिर ते मोबारेश्वर मंदिर कडील रस्ता देखील खड्डेमय असून या मार्गावरील तिन्ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी श्री. खोबरेकर यांनी केली.

मालवण कसाल महामार्गावर जरीमरी ते कुंभारमाठ शिवाजी पुतळ्यापर्यंत जाणारा रस्ता खड्डेमय बनला असून आनंदव्हाळ उताराकडे देखील खड्ड्यांमुळे वाहन चालकांची गैरसोय होत आहे. तसेच मालवण आडारी मार्गे बेळणे जाणारा रस्ता, कट्टा पेंडूर रस्ता ते हुबळीचा माळ जाणारा रस्ता, कट्टा गुरामवाड गोळवण मसदे कडे जाणारा रस्ता या प्रमुख मार्गांची दुरावस्था झाली असून संबंधित ठेकेदारांकडून सदरील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करून घेण्यात यावीत. या ठिकाणी वाहतूक करताना वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. गणेश चतुर्थी पूर्वी हे रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात याव्यात, अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बबन शिंदे आणि हरी खोबरेकर यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!