दोन्ही पायांनी अपंग ; तरीही सदस्य नोंदणीसाठी गाठलं शिवसेनेचं कार्यालय …!
कांदळगावच्या विलास भोगलेंची अनोखी पक्षनिष्ठा ; हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर यांनी केलं कौतुक
मालवण | कुणाल मांजरेकर
वयाची साठी बदललेली… त्यात दोन्ही पायांनी अपंगत्व… त्यामुळे शरीर थकलेलं… असं असतानाही शिवसेना या शब्दांवर असलेलं प्रचंड प्रेम आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सचोटीचा विश्वास दाखवून दिला आहे मालवण तालुक्यातील कांदळगाव परबवाडी येथील विलास भिकाजी भोगले यांनी ! सध्या शिवसेनेवर राजकीय संकट ओढवलं असून शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेची सदस्य नोंदणी जोमाने सुरू आहे. त्यामुळे पक्षनिष्ठा दाखवण्यासाठी “हीच ती वेळ” मानून विकास भोगलेंनी स्वतःचं अपंगत्व विसरून थेट मालवणचं शिवसेना कार्यालय गाठलं. याठिकाणी त्यांनी स्वतःचा सदस्य नोंदणी अर्ज भरून घेतला. यावेळी त्यांच्या पक्षनिष्ठेचं तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह उपस्थित शिवसैनिकांनी कौतुक केलं.
सध्या राज्यात राजकिय भूकंप झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत स्वतंत्र गट स्थापन केला असून शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी ज्यांना आजवर मोठमोठी पदं दिली, ते राज्यातील शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार तसेच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेवरच दावा केल्याने शिवसेना प्रथमच एवढ्या मोठ्या अडचणीत आली आहे. त्यामुळे कायदेशीर लढाईला सामोरे जाण्यासाठी शिवसैनिकांकडून सदस्य नोंदणी, शपथपत्र भरून घेतली जात आहेत.
याची माहिती मिळताच दोन्ही पायांनी अपंग असलेल्या कांदळगाव परबवाडी येथील विलास भोगले यांनी मालवणची शिवसेना शाखा गाठली. याठिकाणी उपस्थित असलेल्या तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडून त्यांनी शिवसेनेचा सदस्य नोंदणी अर्ज भरून घेतला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी त्यांचे कौतुक केले. यावेळी मनोज मोंडकर, श्री. माडये आदी उपस्थित होते.
आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेबांनंतर संघटनेला दिशा देण्याचे काम केले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामाची जगभरातून प्रशंसा झाली. आज दुर्दैवाने शिवसेनेवर संकट ओढवले आहे. अनेक ठिकाणचे आमदार, खासदार जरी उद्धव साहेबांना सोडून गेले असले तरी तळागाळातील शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मालवण तालुक्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवले असून मालवण तालुक्यातील शिवसैनिक नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहील, असा विश्वास विलास भोगले यांनी व्यक्त केला.