खरारे – पेंडूर मध्ये गवारेड्यांची दहशत ; माजी खा. निलेश राणेंची वनविभागाशी चर्चा
ग्रामस्थांनी वेधले होते निलेश राणेंचे लक्ष ; तातडीने कार्यवाही करण्याच्या राणेंच्या सूचना
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील खरारे- पेंडूर गावात गवा रेड्यांची दहशत पाहायला मिळत आहे. गवारेड्यांचे कळपच्या कळप दिवसा ढवळ्या रस्त्यावरून फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर येथील काही ग्रामस्थांनी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधल्यानंतर मालवण कट्टा येथील वनपालांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी खरारे पेंडूर भागातील वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करा, अशा सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
मालवण तालुक्यातील पेंडूर गावात गेल्या काही दिवसांपासून गव्या रेड्यांचा धुमाकूळ सुरू आहे. सुमारे १० ते १२ गव्यांचा कळपाचा येथे राजरोस वावर सुरू आहे. त्यामुळे पायपीट करत जाणारे शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ भितीच्या छायेत आहेत. हे गवे रेडे परिसरातील भात शेतीचेही नुकसान करत आहेत. या पार्श्वभूमीवर येथील काही ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधत वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याची मागणी केली होती. याबाबत निलेश राणेंच्या सूचनेनुसार योगेश घाडी, चेतन वालावलकर, सुमित सावंत आदींनी कट्टा येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी माजी खा. निलेश राणे यांनी दूरध्वनीवरून चर्चा करीत पेंडुर खरारे भागातील वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची सूचना केली. याठिकाणी जीवितहानी होण्याआधी सदरील गवारेड्यांचा बंदोबस्त करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. यावेळी खरारे पेंडूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गवारेड्यांचा बंदोबस्त करण्या बाबत निवेदन सादर करण्यात आले.