मसुरेत ७ वर्षीय मुलाचा प्रामाणिकपणा ; रस्त्यात मिळालेले बाराशे रुपये केले परत
मसुरे : आज सर्वत्र माणुसकी लुप्त होत आहे. पैशासाठी माणसे आज आपले विचार आणि प्रामाणिकता बाजारात विकत असताना मसुरे बाजारपेठ येथील मिहीर शैलेश मसुरकर या ७ वर्षीय बालकाने प्रामाणिकपणाचे मूर्तीमंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. मसुरे केंद्र शाळा येथे दुसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मिहीर याला रस्त्यात मिळालेले बाराशे रुपये त्याने परत करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
रविवारी संध्याकाळी मसुरे मर्डे बाजारपेठ येथे आपल्या मोठ्या बहिणी कडे तो जात असताना त्याला रस्त्यामध्ये पडलेले बाराशे रुपये मिळाले. त्याने प्रामाणिकपणे ते सर्व पैसे तेथीलच नाचणकर काकांकडे देऊन त्यांना रस्त्यावर पडलेले हे पैसे मला मिळाले असून ज्याचे असतील त्यांना तुम्ही परत द्या असे सांगितले. यानंतर नाचणकर काकांनी या पडलेल्या पैशाचा शोध घेता येथीलच राहुल शिवाजी परब या युवकाला त्याचे पैसे पुन्हा परत दिले. मिहीर हा मसुरे केंद्रशाळा येथे शिकत असून प्रशालेत त्याला त्याच्या शिक्षकांकडून आणि आई-वडिलांकडून प्रामाणिक पणाचे धडे मिळाले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्याला बक्षीस स्वरूपात देऊ केलेली रक्कम सुद्धा त्याने मोठ्या मनाने नाकारली. मीहीर मसुरकर याच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.