… तर महाराष्ट्रात तुला काम करायला देणार नाही ; “त्या” ठेकेदाराला वैभव नाईकांचा सज्जड दम

मालवण शहरातील अर्धवट गटार खोदाई प्रश्नी ठेकेदाराला धरले धारेवर

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण शहरातील अर्धवट स्थितीतील गटार खोदाईमुळे यंदा शहरवासीयांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अर्धवट गटार खोदाईमुळे शहरात पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी मालवण शहरात येत ठेकेदाराच्या सुपरवायझरला फैलावर घेत चांगलाच दम भरला. ठेकेदाराच्या हातात असलेली फाईल आमदारांनी काढून घेत “फाईल कसल्या फिरवतोस तोंडात मारून देईन” असा आक्रमक इशारा देतानाच तुला महाराष्ट्रात फिरायला देणार नाही, अशा शब्दांत आमदार नाईक यांनी ठेकेदाराला दम भरला.

नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यावरही आमदार नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्हाला सांगूनही कामे होत नाहीत. काम न करणाऱ्या अश्या ठेकेदाराला बांधुन ठेवा अशी संतप्त भूमिका आमदार नाईक यांनी मांडली.

मालवण शहरातील गटार खोदाईचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. यामुळे पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या भाजपा कडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच स्थानिक शिवसेना नेते, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून दिली होती. यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती बाबत देखील नाराजी व्यक्त करून त्यांची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे करणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी आ. वैभव नाईक यांचे मालवण शहरातील अपूर्ण गटार खोदाईकडे लक्ष वेधल्यानंतर आ. नाईक यांनी बुधवारी दुपारी मालवण शहराला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली.यावेळी गटार खोदाईचा ठेका घेऊनही काम रखडून ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच शहरात रखडलेली गटार खोदाई प्रशासनाने पूर्ण करून घ्यावी. असे आमदार नाईक यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले. तसेच अर्धवट कामे करून जनतेला वेठीस धरणाऱ्या या ठेकेदाराला महाराष्ट्रात काम करू देणार नाही. अशी आक्रमक भूमिका आमदार वैभव नाईक यांनी घेतली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, संमेश परब, किरण वाळके, महेंद्र म्हाडगूत, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, स्वप्निल आचरेकर, बाळू नाटेकर, सिद्धार्थ जाधव, मनोज मोंडकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत यांनीही गटार खोदाई कामाबाबत ठेकेदार व प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. वारंवार सांगूनही योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र ४ लाख पेक्षा जास्त बिल प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आले. याबाबत तक्रार आमदार नाईक यांच्याकडे करण्यात आली. याची दखल घेत आमदार नाईक यांनी संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई व्हावी तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी भूमिका प्रशासनाकडे मांडली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!