“त्या” चर्चांना एकनाथ शिंदे यांनी दिला पूर्णविराम !
कुणाल मांजरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि शिवसेना बंडखोरांच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी जाहीर केली जात आहे. मात्र याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत अद्याप मंत्रीपदांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात बंडाचे निशाण रोवल्यानंतर अल्पमतात आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यापूर्वीच अनेक वृत्तवाहिन्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिंदे गटाला आठ कॅबिनेट तर पाच राज्यमंत्रीपदे मिळतील, अशी शक्यता वर्तवून संभाव्य मंत्रिमंडळात कोण कोण असतील, हे देखील स्पष्ट केले आहे. मात्र याला एकनाथ शिंदे यांनी अक्षय घेतला आहे. आपल्या ट्विटर हँडल वरून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर अद्याप कोणतीही चर्चा न झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. “भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.” असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका ट्विट मध्ये “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.