उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदा बरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा
उद्या मुंबईत दाखल होणाऱ्या बंडखोर आमदारांना विरोध न करण्याचे शिवसैनिकांना आवाहन
शिवसेनेतील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानेही महाविकास आघाडीला उद्या (गुरुवारी) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदा बरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. फेसबुक लाईव्ह वरून त्यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये त्यांनी आपल्या कार्यकालाचा आढावा घेतला आणि आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, उद्या केंद्राचा मोठा पोलीस फौजफाटा मुंबईत दाखल होत असून माझ्या शिवसैनिकांचे मुंबईत रक्त सांडू नये, यासाठी कोणीही उद्या मुंबईत येणाऱ्या बंडखोर आमदारांना रोखू नये, असे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे.