मालवणात शहरातील मैला नगरपालिकेकडून कोळंबच्या खाडीत डम्पिंग ?
काँग्रेसच्या आरोपामुळे खळबळ : पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला दिली धडक
मुख्याधिकारी गैरहजर, अन्य जबाबदार अधिकारीही नाही ; पालिकेचा कारभार “रामभरोसे”
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण नगरपालिकेमार्फत शहरातून जमा करण्यात येणारा मैला थेट कोळंबच्या खाडीत डम्पिंग करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केला. दरम्यान, याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी नगरपालिकेत गेले असता मुख्याधिकारी गैरहजर होते. त्यांच्या व्यतिरिक्त याठिकाणी कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याने प्रशासकीय राजवट असलेल्या पालिकेच्या कारभारावर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी टीका केली.
श्री. अंधारी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी मालवण नगरपालिकेला धडक देत कचऱ्याच्या प्रश्नाबाबत जाब विचारला. यावेळी संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, पल्लवी तारी, श्रीकृष्ण तळवडेकर, लुईस मेंडीस, लक्ष्मीकांत परूळेकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने हेड क्लार्कबाबत पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता हेड क्लार्क पद रिक्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालिकेत जबाबदार व्यक्ती नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक पदाचा कार्यभार असलेल्या प्रसाद भुते यांनी या शिष्टमंडळाची भेट घेतली. मात्र त्यांची चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाल्याने त्यांना शहाराबाबत माहिती नसल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
पालिकेकडून उचलला जाणारा शहरातील कचरा आणि मैला कुठे टाकला जातो, असा सवाल पदाधिकारी यांनी विचारला असता डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा टाकण्यात येत असल्याचे उत्तर श्री. भुते यांनी दिले. यावर बुधवारी पालिकेमार्फत काढण्यात आलेला मैला कोळंबच्या खाडीत साळसकर स्मशानभूमी नजीक टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी करून याबाबत नागरिकांनी त्याचवेळी जाब विचारल्याचे सांगितले. यावेळी गाडीवरील कर्मचारी यांनी देखील मैला टाकल्याचे मान्य केल्याचे संदेश कोयंडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार : बाळू अंधारी
सध्या आपत्ती काळ सुरू आहे. असे असताना प्रशासक राजवट असलेल्या मालवण नगरपालिकेत स्वतः प्रशासक गैरहजर राहतात. त्यांचा चार्ज घेण्यासाठी हेड क्लार्क पद रिक्त आहे. स्वच्छता निरीक्षकाला त्यांचेच कामगार ऐकत नाहीत. अशावेळी नैसर्गिक आपत्ती घडल्यास पालिकेचे कर्मचारी कोणाचे आदेश ऐकणार ? असा सवाल बाळू अंधारी यांनी केला. शहरातील घाणीचा मैला खाडीच्या पाण्यात टाकला जात आहे. उद्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर जबाबदार कोण ? असा सवाल करून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सफाई कामगार, मुकादम यांच्या पुढे स्वच्छता निरीक्षक निरुत्तर
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सफाई कामगार, मुकादम यांना पालिकेत बोलावून त्यांच्याकडून खरेखोटे करून घेण्याची मागणी केली. यावेळी स्वच्छता निरीक्षकानी कामगारांना फोन केला असता सर्वप्रथम त्यांचा फोन कोणी उचलला नाही. त्यानंतर हा फोन उचलून ड्युटी संपल्याने पालिकेत येण्यास त्यांनी नकार दर्शवला. त्यामुळे कामगारां समोर स्वच्छता निरीक्षक निरुत्तर झाल्याचे दिसून आले. सफाई कामगार आणि मुकादम जर अधिकाऱ्याचे ऐकत नसतील तर मालवण नगरपालिकेचा कारभार कोणत्या पध्दतीने सुरू आहे, हे स्पष्ट होते, असे बाळू अंधारी म्हणाले. मालवण नगरपालिका जिल्ह्यातील सर्वात अकार्यक्षम असल्याचा आरोप त्यांनी केला.