“त्या” राणे समर्थकावर निलेश राणे भडकले

कुणाल मांजरेकर

भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे हे आक्रमक आणि सडेतोड भूमिकेसाठी ओळखले जातात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पंकजा मुंडे भाजपाला ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि भाजपामधील राणे समर्थक संतोष पाटील यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर निलेश राणे यांनी संताप व्यक्त करत संतोष पाटील यांना माफी मागण्याची सूचना करत परत असा मूर्खपणा न करण्याचा सज्जड दम भरला आहे.

“पंकजा ताई माझी मोठी बहीण आहे आणि मुंडे परिवाराशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. हा मूर्खपणा कोणी करत असेल तर त्या व्यक्तीने माफी मागावी आणि परत असा मूर्खपणा करू नये, सहन केलं जाणार नाही” अशा शब्दांत निलेश राणे यांनी संतोष पाटील यांना फटकारले आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने त्यांच्या संतप्त समर्थकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर तुळजापुरात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची गाडी अडवल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर भाजपातील खदखद बाहेर पडत असताना संतोष पाटील यांनी हे वक्तव्य केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात पर्याय नसल्याचा दावाही पाटील यांनी केला होता. यासंदर्भात प्रसार माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात संतोष पाटील म्हणाले की, “केवळ राजकीय द्वेषापोटी पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांची प्रतिमा बहुजन समाजाविरोधी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांचा पक्षांतर्गत जाणीवपूर्वक सुरू असलेला संघर्ष योग्य नाही, असं मतही व्यक्त केलं होतं.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!