“त्या” महिलेच्या “अदखल” तक्रारीची मनसेच्या हस्तक्षेपानंतर “दखल”

मालवण मधील घटना : घरगुती वादातून महिलेला झाली होती मारहाण

मालवण : घरगुती वादातून शहरातील धुरीवाडा येथील सौ. रिया राजेश पाटकर (वय ४५) या महिलेस शिवीगाळ तसेच मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी तिचा दीर प्रवीण हनुमंत पाटकर (रा. धुरीवाडा, मालवण) याच्या विरोधात अखेर मालवण पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या महिलेस झालेल्या मारहाण प्रकरणात महिलेच्या पहिल्या तक्रारीनंतर अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता. त्यामुळे संशयिताकडून पीडित महिलेला वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी करत बुधवारी याप्रकरणी पोलिसांचे लक्ष वेधले. त्यानंतर संशयितावर दखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सौ. पाटकर या आपला पती, मुलगा व मुलीसह धुरीवाडा येथे एकत्र कुटुंबात राहतात. त्याच घरात दुसऱ्या बाजूस त्यांची सासू व दीर प्रवीण पाटकर असे एकत्र राहतात. या दोघांमध्ये घरगुती कारणावरून बोलाचाली नाही. ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता सौ. रिया पाटकर या काम करून घरी गेल्या असता दीर प्रवीण पाटकर याने घर आपले असून तुम्ही घरातून बाहेर पडा अशी धमकी दिली. मात्र धमकीला न जुमानल्याने प्रवीण याने सौ. पाटकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या गळ्याला पकडत हाताच्या मुटक्याने डोक्यावर मारले. तर हनुवटीवर धारदार वस्तूने मारून दुखापत केली. त्यामुळे सौ. पाटकर या रेवतळे येथे आपल्या माहेरी निघून गेल्या. तसेच ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर प्रवीण पाटकर याने सौ. पाटकर यांच्या मुलाला घराबाहेर काढून ठार मारण्याची धमकी दिली. या तक्रारीनुसार मालवण पोलिसांनी संशयित प्रवीण पाटकर याच्या विरोधात प्रथमतः अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र आपल्याला झालेली मारहाण गंभीर स्वरूपाची असतानाही संबंधितावर दखलपात्र गुन्हा दाखल न केल्याने सौ. पाटकर यांनी पोलीस अधीक्षक यांच्या नावे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मालवण पोलीस ठाण्यात धडक देऊन पोलीस उपनिरीक्षक श्री. नरळे यांची भेट घेत पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, सौ. भारती वाघ, ज्योत्स्ना मयेकर आदी उपस्थित होते. त्यानंतर पोलिसांनी संशयितावर भा.द.वि. कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील महिलेस तिच्या दिराकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यास विलंब केला. मात्र महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार गंभीर असून तिला दिरापासून पुन्हा धोका असल्याने तिने मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली. त्यामुळे या प्रकरणी पुन्हा तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी. मालवण शहरात महिला असुरक्षित असल्या तर त्यांच्या पाठीशी मनसे पक्ष संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी प्रतिक्रिया मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3584

Leave a Reply

error: Content is protected !!