दीपक पाटकर : मालवणच्या विकासाचं A to Z सोल्युशन !
कुणाल मांजरेकर
दीपक गणपत पाटकर… मालवण शहरच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकिय – सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हे नाव नवीन नाही. भाजपाचे अभ्यासू पदाधिकारी तसंच नगरसेवक म्हणून काम केलेल्या दीपक पाटकर यांचं सामाजिक कार्य अफाट आहे. नगरपालिका सभागृहात जरी त्यांच्यावर भाजपचं लेबल असलं तरी विकास कामं असो अथवा गोरगरिबांना मदत… राजकीय पक्षाच्या सीमा ओलांडून कार्य करण्याच्या त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच शहरातील नागरिकांनी त्यांना “कार्यसम्राट” ही पदवी बहाल केलीय. २ जून १९६२ रोजी जन्मलेले दीपक पाटकर आज वयाची ६० वर्षे पूर्ण करून ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने त्यांच्या सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील वाटचालीचा थोडक्यात घेतलेला आढावा….
मालवण बाजारपेठेत पाटकर घराण्याचा खूप मोठा नावलौकिक आहे. अशा पाटकर घराण्यात २ जून १९६२ ला दीपक पाटकर यांचा जन्म झाला. शहरातील टोपीवाला हायस्कूल मधून आपलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक क्षेत्रात त्यांनी उडी घेतली. कोणत्याही राजकिय पदाची अपेक्षा न ठेवता समाजातील गोरगरीब लोकांना मदत करणं हे त्यांचं नित्यनियमाचं काम बनलं. केवळ विशिष्ट प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात गरजू लोकांच्या मदतीला धावून जाण्याच्या वृत्तीमुळे “समाजसेवक” म्हणून दीपक पाटकर यांचे नाव शहरात सर्वत्र प्रसिद्ध झाले.
सामाजिक क्षेत्रात काम करत असतानाच २००५ च्या सुमारास कोकणचे भाग्यविधाते म्हणून ओळख असलेल्या नारायण राणे यांच्या ते संपर्कात आले. नारायण राणे यांची काम करण्याची पध्दत पाहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मालवण शहराचे किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुदेश आचरेकर यांच्याशी त्यांची चांगली मैत्री होतीच. त्यामुळे २००६ च्या नगरपालिका निवडणूकीत पक्ष नेतृत्व आणि अन्य सहकाऱ्यांनी केलेल्या आग्रहाखातर दीपक पाटकर यांनी स्वतःचा वॉर्ड सोडून धुरीवाडा वॉर्डातून नगरपालिका निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. यावेळी परिस्थिती अतिशय बिकट होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर दीपक पाटकर यांना उमेदवारी मिळाली असली तरी पक्षांतर्गत बंडखोरीमुळे त्यांना थोडक्या मतांनी पराभव पत्करावा लागला. पण या पराभवाने ते खचून गेले नाहीत. मुळात राजकारण हा त्यांचा पिंडच नव्हता. समाजकार्यासाठी त्यांनी आपलं जीवन वाहून घेतलं असल्याने या पराभवाची कोणतीही तमा न बाळगता त्यांनी मालवण शहरातील आपलं सामाजिक कार्य अविरतपणे सुरू ठेवलं. शहरातील कोणत्याही भागातील गरजू व्यक्ती हक्काने वैद्यकीय, शैक्षणिक कामासाठी हक्काने दीपक पाटकर यांच्याकडे येत होती. त्या प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्याकडून होत होता. कोणत्याही पदावर नसताना लोकांच्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण होत होत्या. यामुळे २००६ मध्ये नगरसेवक पदाच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला तरीही “समाजसेवक” ही लाखमोलाची बिरुदावली त्यांना जनतेने स्वतः बहाल केली होती. यामुळेच बघताबघता मालवण शहरात दीपक पाटकर नावाचं प्रस्थ वाढत होतं.
दीपक पाटकर असो अथवा त्यांचे बंधू परशुराम पाटकर… या दोघांचेही आमदार कालिदास कोळंबकर यांच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आपले राजकीय गुरू तर आमदार कालिदास कोळंबकर हे आपले गॉडफादर असल्याचं ते अभिमानाने सांगतात. मागील २२ वर्षे कोळंबकर कुटुंबाशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. कोळंबकर साहेब, त्यांची आई श्रीमती सुलोचना, पत्नी सौ. नम्रता ह्या आमच्या कुटुंबाचाच एक भाग असल्याचे दीपक पाटकर यांनी म्हटले आहे.
दीपक पाटकर यांच्या कामामुळे शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला होता. देऊळवाडा सागरी महामार्गावरील पुलाकडे मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे येथे गणपती विसर्जनात अडथळे निर्माण होत होते. ही बाब तेथल्या काही नागरिकांनी दीपक पाटकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी पाटकर यांनी कोणत्याही पदावर नसताना नगरपालिकेच्या निधीवर अवलंबून न राहता स्वतःच्या खिशात हात घालून येथील गाळ साफ करून घेतला. त्यांच्या या दातृत्वाचं त्यावेळी फार मोठं कौतुक झालं. त्यामुळे २०११ च्या नगरपालिका निवडणूकीत पक्षाने दीपक पाटकर यांना पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याचा आदेश दिला. यावेळी देखील त्यांना स्वतःच्या वॉर्डातून उमेदवारी न देता देऊळवाडा – आडारी या वॉर्डातून तिकीट देण्यात आले. दीपक पाटकर यांचे सामाजिक कार्य कुठल्याही एका वॉर्डापर्यंत सिमीत नव्हते. संपूर्ण मालवण शहर हीच त्यांची कर्मभूमी होती. त्यामुळे मागील निवडणुकीत दुसऱ्या वॉर्डात जाऊन पराभव पत्करला लागल्याचा इतिहास असतानाही त्यांनी ही निवडणूक लढण्यास होकार दिला. जी व्यक्ती कोणत्याही पदावर नसताना आपल्या प्रत्येक सुख दुःखात धावून येऊ शकते, ती व्यक्ती नगरसेवक बनल्यास आपले कोणतेही प्रश्न शिल्लक राहणार नाहीत, या विश्वासाने येथील मतदारांनी दीपक पाटकर यांना या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून दिले. त्यामुळे समाजसेवक असलेले दीपक पाटकर हे “नगरसेवक” म्हणून उदयाला आले.
भाजपच्या शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपावासी झाले. या नंतरच्या काळात झालेल्या पक्षांतर्गत निवडीत दीपक पाटकर यांना मालवण शहर मंडल अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. या पदावर काम करताना पक्षसंघटना मजबुतीकरण करण्याबरोबरच तळागाळातील नागरिकांचे प्रश्न पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. आजही शहरातील कोणार्क रेसिडन्सी येथील भाजपा कार्यालयात सकाळी ११ ते २ यावेळेत जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यातून मार्ग काढण्यासाठी दीपक पाटकर न चुकता उपस्थिती दर्शवितात. त्यामुळे येथील भाजपा कार्यालयात सकाळच्या सत्रात अनेक गरजूंची वर्दळ दिसून येते.
नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत देऊळवाडा आडारी मधील अनेक विकासकामांना त्यांनी प्राधान्य दिले. देऊळवाडा येथे माणगावकर घर ते चव्हाण घरापर्यंत व्हाळीची स्थानिक नागरिकांची मागणी होती. या कामाला चालना देण्याचे काम त्यांनी केले. तसेच देऊळवाडा ते आडारी गणपती मंदिर परिसरात धामापूर नळपाणी योजनेचे पाणी व्यवस्थितरित्या पोहोचण्यासाठी ७९ लाख रुपये खर्चून या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन त्यांनी टाकून घेतली. आडारी येथे सातत्याने कमी दाबाने वीज पुरवठा होत होता. त्यामुळे वीज वितरण कंपनीशी सातत्याने पाठपुरावा करून याठिकाणी थ्री फेज कनेक्शन मंजूर करून घेत विजेचा प्रश्न मार्गी लावला. येथील विद्युत लाईनवर धोकादायक झाडे असल्याने पावसाळ्यात सातत्याने या ठिकाणी झाडाची फांदी तुटून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. ही बाब लक्षात घेऊन दीपक पाटकर यांनी स्वखर्चातून येथील स्थानिक नागरिक मुन्ना फाटक, बाळा फाटक, समीर फाटक, विजय फाटक, बन्सी शिरोडकर यांच्या सहकार्याने या झाडांची कटाई करून घेतली. या कामासाठी त्यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट पाहिली नाही. त्यामुळे परिसरातील विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निकाली निघाला.
“यांच्या” सहकार्या शिवाय मी अपूर्णच !
आपल्या राजकिय आणि सामाजिक वाटचालीत अनेक मान्यवर आणि सहकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीयमंत्री नारायण राणेसाहेब, आमदार कालिदास कोळंबकरसाहेब यांच्याबरोबरच माजी राज्यमंत्री रविंद्रजी चव्हाण, माजी खासदार निलेशजी राणे, आमदार नितेशजी राणे, प्रमोद जठार, राजन तेली, दत्ता सामंत, अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, उमेश नेरुरकर, बाबा परब, लीलाधर पराडकर, महेश मांजरेकर, विजय नेमळेकर, शेखर गाड, मोहन वराडकर, आनंद पारकर, नाना गोवेकर, बाळू मालवणकर, बाळू आचरेकर, राजू बिडये, ललित चव्हाण, महेश सारंग, आबा हडकर, अशोक तोडणकर, रवी मालवणकर, जगदीश गावकर, भाई मांजरेकर, शरद गावकर, पांड्या फणसेकर, बाबू वायंगणकर, राजा देसाई, प्रमोद मोहिते, कॅलिस फर्नांडिस, संतोष इब्रामपूरकर, दिनेश डिचोलकर, महेश बांदेकर, दादू डिचोलकर, संदेश वाळके, सुभाष मालवणकर, आबा मालवणकर, दादा मांजरेकर, रमेश गावकर, राजन गावकर, अमित नाईक, दुर्गेश गावकर, वसंत गावकर, बाबू धुरी, विजय चव्हाण, बाबू जोशी, बाबू गावकर, गणेश गावकर, हरेश फणसेकर, महेश गावकर, राजू गावकर, नामदेव घाडी, शिवाजी म्हापणकर, दशरथ डिचोलकर, उमेश रानडे, सुमेध रानडे, जितू मराळ, पराग चव्हाण, अमोल चव्हाण, संदेश चव्हाण, नारायण लुडबे, अजित वराडकर, ऍड. सुमित जाधव, आप्पा चव्हाण, उमेश चव्हाण, अर्जुन चव्हाण, किरण चव्हाण, श्यामा आजगावकर, राजू किर, प्रदीप कोरगावकर, संतोष चव्हाण यांसह देऊळवाडा, आडारीमधील अनेक मित्रपरिवार आणि हितचिंतकांचा समावेश आहे, असे दीपक पाटकर यांनी म्हटले आहे.
मागच्या वेळी झालेली २०१६ ची नगरपालिका निवडणूक मालवण शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ करणारी ठरली. मालवण शहराचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणाऱ्या सुदेश आचरेकर यांचे काही कारणास्तव काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याशी बिनसले. त्यावेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यायचा होता. मात्र अशावेळी सुदेश आचरेकर यांच्या बंडामुळे काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे नारायण राणें समोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. त्यावेळी शहरात सर्वमान्य असलेले एकच नाव त्यांच्या डोळ्यासमोर आलं, ते म्हणजे दीपक पाटकर…. नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यास अवघ्या एक- दोन दिवसांचा कालावधी असताना काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नसल्याने ही उमेदवारी अखेर दीपक पाटकर यांना देण्यात आली. त्यांनी देखील पक्षाचा आदेश मानून स्वतःचे जवळचे मित्र असलेल्या आणि अपक्ष म्हणून नगराध्यक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या सुदेश आचरेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यावेळी कोणतीही तयारी नसतानाही दीपक पाटकर यांनी लक्षणीय मते घेतली. यावेळी दीपक पाटकर यांनी दिलेल्या कडव्या लढतीचं मोठं कौतूक झालं. कदाचित त्यावेळी पाटकर यांना थोडा वेळ मिळाला असता तर आज मालवण नगरपालिकेत चित्र वेगळं दिसलं असतं. मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने दीपक पाटकर यांचा शहरावर असलेला प्रभाव अधोरेखित झाला. नगराध्यक्ष निवडणूकीत ते पराभूत झाले असले तरी स्वतःच्या देऊळवाडा- आडारी प्रभागातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून जगदीश गावकर यांना निवडून आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. त्यामुळेच नारायण राणे यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून दीपक पाटकर यांच्या नावाला पसंती दिली
दातृत्वाचा झरा …
दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट निर्माण झाले होते. त्यावेळी लॉकडाउनच्या कालावधीत शहरात ठिकठिकाणी श्री. पाटकर यांनी स्वतःच्या तसेच पक्षाच्या माध्यमातून गरजूंना धान्य, मास्क, सॅनिटायझर वाटप केले जनतेच्या अडीअडचणीत धावून जात प्रत्येकाला धीर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आजारी रुग्णांना औषधोपचार करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याबरोबरच प्रभागातील ३७ कुटुंबांना या कालावधीत धान्य वाटप करून कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची विशेष खबरदारी घेतली. दीपक पाटकर हे क्रीडा रसिक आहेत. त्यांना क्रिकेटची मोठी आवड असून शहरात कोणत्याही भागात क्रिकेट स्पर्धा असल्या की त्याठिकाणी दीपक पाटकर यांची उपस्थिती आणि आर्थिक हातभार प्रकर्षाने दिसून येतो. यामुळे युवा वर्गात त्यांची वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अलीकडेच धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिर मंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मालवण शहरातील वेगवेगळ्या प्रभागात अलीकडे त्यांनी नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस उपलब्ध करून दिले आहेत. तसेच रेडकर हॉस्पिटल मागील महापुरुष रेवतळे मंडळाला जेवणासाठी टेबल उपलब्ध करून दिली. अलीकडे रेडकर हॉस्पिटल मागील परुळेकर कुटुंबीयांच्या पडवीला अचानक आग लागून त्यांचे राहते घर आगीत बेचिराख झाले. या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ही दुर्घटना समजतात दीपक पाटकर यांनी तात्काळ या ठिकाणी धावून जात त्यांना मदत दिली. एवढेच नाही तर या कुटुंबाला स्वतःचे घर बांधून देण्याचा शब्द देत या शब्दाप्रमाणे कार्यवाही करत निराधार बनलेल्या कुटुंबाला आधार देण्याचे काम केले. त्यामुळे स्थानिकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा नेता म्हणून दीपक पाटकर यांना ओळखले जाते. केवळ मालवण शहरच नव्हे तर जिल्हा रुग्णालयासह मुंबईतील केईएम, जेजे, नायर, टाटा आदी हॉस्पिटलमध्ये शहरातील अनेक गरजू रुग्णांना पाठवून त्यांच्या उपचाराची सर्व व्यवस्था दीपक पाटकर यांनी केली आहे. आज आरोग्य असो अथवा शिक्षण, सरकारी कार्यालयातील काम असो अथवा पोलीस ठाण्याशी संबंधित काम, प्रत्येक ठिकाणी रात्री अपरात्री धावून येणारा हक्काचा माणूस म्हणून दीपक पाटकर यांची ओळख आहे. त्यामुळे मालवणच्या विकासाचं “ए टू झेड सोल्युशन” म्हणून दीपक पाटकर यांच्याकडे बघितलं जातं. आज त्यांचा ६० वा वाढदिवस साजरा होतोय. यानिमित्ताने देखील विविध सामाजिक उपक्रम त्यांनी आखले असून मालवणच्या या “कार्यसम्राट” लोकनायकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !