राणेंच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले लीलावती रुग्णालयात !
प्रकृतीची विचारपूस ; माजी खा. निलेश राणे, अमित ठाकरे यांची उपस्थिती
मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राणेंची लीलावती मध्ये भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रंगशारदामधील कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे नारायण राणेंची भेट घेण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. यावेळी राणेंचे सुपुत्र, माजी खासदार निलेश राणे, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, आदी उपस्थित होते.
नारायण राणे यांच्यावर लिलावती रुग्णालयात अॅजिओप्लास्टी करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर अनेक नेते नारायण राणे यांना भेटण्यासाठी जात आहेत. नारायण राणे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे राणे कुटुंबीय आणि डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये ब्लॉक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तसेच त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याचदिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.राज ठाकरे आणि नारायण राणे यांची ही भेट जरी राजकीय भेट नसली तरी राज्याच्या राजकारणातले दोन दिग्गज नेते भेटल्याने या भेटीची चर्चा होत आहे.