मुख्यमंत्र्यांवर थेट लीलावती मधून नारायणास्त्राचे “वार” !
उद्धव ठाकरे, गडकरींच्या कार्याचे आणि गुणांचे अनुकरण कधी करणार ?
कुणाल मांजरेकर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली असून रविवार पर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. मात्र रुग्णालयात दाखल असतानाही राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील हल्लाबोल सुरूच असल्याचे पाहायला मिळाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केल्याच्या पार्श्वभूमीवर राणेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. भाजपचे वेगळेपण हे कार्यात आहे. म्हणूनच कार्यसम्राट नितीन गडकरींसाठी आपण शुभेच्छा दिल्यात. आपण त्यांच्या कार्याचे व गुणांचे अनुकरण कधी करणार ? असा सवाल राणेंनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये गेले असताना त्यांना डॉक्टरांनी अँजिओग्राफीचा सल्ला दिला. त्यानंतर त्यामध्ये काही ब्लॉकेजेच आढळून आले. म्हणूनच त्यांच्यावर आजच अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान ब्लॉकेजेस हटवण्यासाठी एक स्टेन टाकण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून दोन-तीन दिवसांत त्यांची तब्येत पाहून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.
दरम्यान, राणेंना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आमदार नितेश राणे यांनी नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर स्वतः नारायण राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस असून शिवसेनेकडून तसेच मुख्यमंत्री ठाकरेंकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राणेंनी ट्विट करीत ठाकरेंना टोला लगावला आहे.
देशातील भाजप नेते राजकारणातील व आत्मनिर्भर भारतासाठी कामाचा व कार्याचा स्तर वाढवित असताना शिवसेना राजकारणाचा तळ गाठत आहे, याबाबत आत्मपरीक्षण करावे, असे सांगून भाजपचे वेगळेपण हे कार्यात आहे. म्हणूनच कार्यसम्राट नितीन गडकरींसाठी आपण शुभेच्छा दिल्यात. आपण त्यांच्या कार्याचे व गुणांचे अनुकरण कधी करणार ? (हे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी) असे राणेंनी म्हटले आहे.