मालवणचे सुपुत्र, प्रख्यात वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांच्या शिरपेचात मानाचा तुरा !

नांदेडचा प्रतिष्ठेचा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

३० एप्रिल रोजी कंधार येथे ना. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा

मालवण : कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध ठिकाणच्या १६ पत्रकारांना जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रभूषण राज्यस्तरीय पुरस्कार मालवणचे सुपुत्र तथा लोकशाही न्यूजचे वृत्तनिवेदक ऋषी देसाई यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा ३० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या हस्ते कंधार येथे होणार आहे.

पत्रकारांनी केलेल्या उत्कृष्ट कामाचा सन्मान होण्याच्या उदेशाने हे पुरस्कार देण्यात येतात. ऋषी देसाई हे लोकशाही न्यूज मध्ये वृत्त निवेदक म्हणून कार्यरत असून यापूर्वी साम मराठी, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी या अग्रगण्य वृत्त वाहिन्यात त्यांनी मागील दशकभरात स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘समीक्षा’, प्राईम वॉच, डोळ्यांन पाहीन रूप तुझे, अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं वेगळेपण मांडताना लोकशाही न्यूजवरील ‘ऋषी देसाईचा फटका’ हा महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेवर कोरडे ओढणारा कार्यक्रम प्रेक्षकांसोबत टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटवर आपली छाप उमटवत घोडदौड करत आहे. मालवणी बोलीभाषेतील लेखनासह राजकीय लेखन याबद्दलही ऋषी देसाई यांची विशेष ओळख आहे. ३० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्हा पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी ऋषी देसाई हे पत्रकारांना नव्या माध्यमातील पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!