आता आपण कोरोनाच्या कानात आत्मविश्वासाने सांगू शकतो “तू संपलास” !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा टोला
कुणाल मांजरेकर
नारायण राणेंच्या अटकेमुळे मंगळवार दिवस नाट्यमय घडामोडींमुळे गाजला. या नाटकांमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षही राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोनाला विसरून गेले. यावरून आता मनसेने टोला लगावला आहे. “आता आपण कोरोनाच्या कानात आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास” असं खोचक ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री विरोधी वक्तव्यानंतर राज्यात शिवसेनेने ठिकठिकाणी आंदोलने केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने देखील अनेक ठिकाणी आंदोलने केली. या आंदोलनामध्ये सर्वांना कोरोनाचा विसर पडला. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात कोरोना वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊनची भाषा करीत असताना त्यांचाच पक्ष कोरोना विसरून गेल्याने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून राज्य सरकारला टोला लगावला आहे.
“कालच्या भानगडीमुळे महाराष्ट्राला झालेले फायदे 1)डेल्टा, डेल्टा प्लस अस काही नसतं 2)घरचंच आंदोलन होत त्यामुळे आपल्यावर खापर फुटू नये म्हणून तिसऱ्या लाटेला सुट्टी 3)सोशल डिस्टनसिंगचा फज्जा पत्रकार विसरले 4)आता आपण करोनाच्या “कानात”आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास.” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.