जागतिक हिवताप दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने रेवतळे, दांडी येथे रॅली
हिवतापाची लक्षणे, प्रतिबंध आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन
कुणाल मांजरेकर
मालवण : जागतिक हिवताप दिनानिमित्त मालवण शहरातील प्राथमिक शाळा दांडी आणि प्राथमिक शाळा रेवतळे येथे मुलांना हिवतापाची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करून रॅली काढण्यात आली.
२५ एप्रिल या जागतिक हिवताप दिनानिमित्त प्राथमिक शाळा दांडी येथे हिवताप आजाराची लक्षणे, प्रतिबंध तसेच घ्यावयाची काळजी याबाबत आरोग्य कर्मचारी एस. ए. चांदोसकर यांनी मार्गदर्शन केले. या रॅली करिता आरोग्य सेविका श्रीमती एस. एस. वेंगुर्लेकर, आरोग्यसेविका एस. एस. प्रभू, मुख्याध्यापिका विशाखा सावंत, उपशिक्षक तांबे, सावंत, ठाकूर यांसह सर्व शिक्षक उपस्थित होते.
तर मालवण शहर प्राथमिक शाळा रेवतळे येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी हिवताप विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या ठिकाणी देखील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. या रॅली करिता वैद्यकीय अधीक्षक बालाजी पाटील, आरोग्य सेवक एस एस चांदोस्कर, आरोग्यसेविका एस. एस. प्रभू, एस. ए. वेंगुर्लेकर, प्राथमिक शाळा रेवतळेच्या मुख्याध्यापिका सौ. देशमुख, सहशिक्षिका तसेच भरड अंगणवाडी सेविका शुभदा योगेश साटम व रेवतळे अंगणवाडी सेविका आरोंदेकर व अन्य उपस्थित होते.