शिवसेनेच्या शाखेसमोर भाजपचे फटाके ; कुडाळात भाजपचा जल्लोष !
दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण
अंगावर आलात तर शिंगावरच घेणारच : विनायक राणेंचा इशारा
कुणाल मांजरेकर
कुडाळ : नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका आणि त्यानंतर राणेंवर झालेली अटकेची कारवाई यांमुळे शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ठिकठिकाणी राडे सुरु झाले आहेत. सिंधुदुर्गात देखील अशीच परिस्थिती असून एकमेकांना आव्हान – प्रति आव्हान देण्याच्या प्रकारात वाढ होऊ लागल्याने पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. मंगळवारी कुडाळ मध्ये राणे समर्थक आणि शिवसैनिक वारंवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याची घटना घडली. सकाळी शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेसमोर नारायणर राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यानंतर रात्री उशिरा राणेंना जामीन मंजूर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुडाळमध्ये अक्षरशः दिवाळी साजरी केली. यावेळी शिवसेनेच्या शाखेसमोर फटाके फोडण्यात आले. यावेळी पुन्हा एकदा दर्पणही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना – भाजप मध्ये पुन्हा एकदा मोठा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गात मंगळवारचा दिवस राजकीय धुमशानाचा ठरला. कुडाळमध्ये सकाळी शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवसेना शाखेसमोर नारायण राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. याची आगाऊ कुणकुण लागलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांना त्याची पूर्वसूचना देत असा प्रकार झाला तर आमच्याकडून शांत राहण्याची अपेक्षा करू नका असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वेळेवर शिवसेना कार्यालयात जात पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले होते. यानंतर दिवसभर नारायणराव राणे यांना अटक न झाल्यास यात्रा रोखण्याच्या धमक्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून दिल्या जात होत्या, तर भाजपा कार्यकर्त्यांकडुन यात्रा अडवून दाखवण्याची प्रतिआव्हाने दिली जात होती. दुपारी नारायण राणे यांना पोलिसांनी अटक करून महाडला नेल्यानंतर हा क्लायमॅक्स शिगेला गेला. रात्री उशीरा राणेंना जामीन मिळाल्याची बातमी बाहेर येताच भाजपा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला सीमा उरली नाही. सिंधुदुर्गच्या राजाला केलेला नवस नारळ देऊन फेडत कार्यकर्त्यांनी घोषणा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत अक्षरशः दिवाळी साजरी केली. सकाळी जेथे नारायण राणेंचा पुतळा जाळण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी जात त्यांनी शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. थोड्या वेळानंतर शिवसेना पदाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले असता पुन्हा एकदा भाजपा कार्यकर्त्यांनी तेथे जात घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी केली. उद्धव ठाकरे हाय हाय… निंब का पत्ता कडवा हो… अशा आक्रमक घोषणा देत फटाक्यांच्या माळा शिवसेनेच्या शाखेसमोर फोडण्यात आल्या. वातावरण तंग होत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र नाक्यानाक्यावर फटाके, घोषणा आणि डीजेच्या तालावर भाजपाचा आनंदोत्सव चालुच होता. यापुढे अंगावर आलात तर शिंगावरच घेणार असा सज्जड दम कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे यांनी यावेळी दिला. गुरुवार पासून राणेंची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु होत असून दोन दिवसात जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष अधिक भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.