आठ दिवसांत “ती” पर्ससीन नौका जप्त न केल्यास मत्स्यव्यवसाय कार्यालयातच उपोषण छेडणार

पारंपरिक मच्छिमारांचा इशारा ; मालवण मधील सहा. मत्स्यव्यवसाय कार्यालयावर धडक

मालवण : अवैधरित्या मासेमारी करणारी आचरा येथील पर्ससीन नौका जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही मत्स्यव्यवसाय विभागाने अद्यापपर्यंत ही नौका जप्त केलेली नाही. याचा जाब विचारण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांनी बुधवारी येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येत्या आठ दिवसात ही नौका जप्त न केल्यास मत्स्यव्यवसाय कार्यालयातच उपोषणास बसणार असल्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी मत्स्यव्यवसायच्या अधिकाऱ्यांना दिला.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स, एलईडी धारकांनी धुमाकूळ घातला असून मासळीची लूट सुरू केली आहे. याचा तसेच अन्य समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी श्री. मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमार नेते बाबी जोगी, भाऊ मोर्जे, प्रशांत तोडणकर, चैतन्य तारी, हेमंत पराडकर, पंकज मालंडकर, मंदार आडकर यांच्यासह अन्य मच्छीमार बांधवांनी धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, मत्स्य अधिकारी तेजस्विता करंगुटकर, मुरारी भालेकर उपस्थित होते.


सागरी हद्दीत अवैधरित्या पर्ससीन नेटच्या सहाय्याने मासेमारी करताना आचरा येथील एक नौकेवर कारवाई करण्यात आली होती. मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबतची फिर्याद दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच तहसीलदारांनी ही नौका जप्त करण्याची कार्यवाही करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाला दिले होते. मात्र आता दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी मत्स्यव्यवसाय विभागाने ही नौका जप्त न केल्याने संतप्त मच्छीमारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अद्यापपर्यंत ही नौका जप्त केली जात नसल्याने अधिकाऱ्यांचे हात दगडाखाली असल्याचा आरोप श्री. मालंडकर यांनी यावेळी केला. येत्या आठ दिवसांत ही नौका जप्त करून मालवण बंदरात आणण्यात यावी, अन्यथा आपण कार्यालयातच उपोषणास बसणार असल्याचा इशारा श्री. मालंडकर यांनी दिला. मालवण बंदर हे संवेदनशील असल्याने ही नौका जप्त करून देवगड येथील सुरक्षित बंदरात ठेवली जाईल असे पोलीस निरीक्षक श्री. ओटवणेकर यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स, एलईडी ट्रॉलर्सनी धुमाकूळ घातला आहे. मत्स्यव्यवसाय खात्याकडे गस्तीनौका नसल्याने ही घुसखोरी रोखणे कठीण बनले आहे. आता परीक्षा संपल्याने पोलीस प्रशासनाने कारवाईसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त दिला जाईल असेही पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले. त्यानुसार ८ एप्रिल पासून कारवाई सुरू केली जाईल असे मत्स्यव्यवसायच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सर्जेकोट, आचरा बंदरात रात्रीच्यावेळी पर्ससीनची मासळी उतरवली जात असून तेथील सुरक्षारक्षकच त्यांना साथ देत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री. मालंडकर यांनी यावेळी केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!