अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा मालवणला फटका ; जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
मालवण : मंगळवारी रात्री मालवण मध्ये जोरदार वाऱ्यांसह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मालवण परिसरात मोठे नुकसान झाले आहे. शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी मालवण तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देत नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे यासह महसूल अधिकारी उपस्थित होते. वायरी भागात झाडे पडून घरांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी यावेळी करण्यात आली. मालवण तालुक्यात सुमारे १५ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच एक प्राथमिक शाळा इमारत, एक प्राथमिक आरोग्य केंद्र, हॉटेल, एक गोठा यांचे पडझड होऊन नुकसान झाले असल्याची माहिती महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. यासह अनेक ठिकाणी मार्गावर तसेच वीज वाहिन्यांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित होता. ८ एप्रिल पर्यत पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.