गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर टीकाकारांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात “राजगर्जना” !
मनसेच्या वतीने ठाणे येथे उत्तरसभेचे आयोजन
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्ताने मुंबईतील शिवतीर्थावर घेतलेल्या विराट सभेनंतर मनसेच्या राजकीय भूमिकेवर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत आहे. या टीकाकारांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत. येत्या ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता ठाणे येथे राज ठाकरेंची “उत्तर सभा” होणार असून या सभेतून राजकीय टीकाकारांना ते प्रत्युत्तर देणार आहेत. त्यामुळे राजगर्जनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला मुंबईतील शिवतीर्थावर घेतलेल्या विराट सभेत राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीवर टीका करताना मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर देखील आवाज उठवला होता. यावेळी हे भोंगे न उतरल्यास मनसेच्या शाखांवर स्पीकर वरून हनुमान चालीसा लावण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. या मेळाव्यात राज ठाकरेंनी भाजपवर टीका करण्याचे टाळल्याने मनसेच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे ठाण्यात उत्तरसभा घेणार आहेत.
गुढीपाडवा भाषणानंतर राज ठाकरे यांच्यावर आणि मनसेवर राज्यातील सत्ताधारी पक्ष टीकेचे बॉम्बगोळे टाकतायत. या बॉम्बगोळ्यांना सणसणीत आणि खणखणीत उत्तर देणं गरजेचं आहे. त्यासाठीच आहे, राज ठाकरे यांची ‘उत्तर’सभा! हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचे ‘ठाणे’ असलेल्या ठाण्यात !!” असे ट्विट मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी केले आहे. तर “वळवळण्याऱ्या किड्या मुंग्याची उत्तर क्रिया करणार नऊ एप्रिल सायंकाळी साडेसहा वाजता ठाण्या मध्ये #उत्तरसभा” असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.