ढोलपथक, लाठी – काठी, मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषेने मालवणात नववर्ष स्वागत यात्रेत उत्साह

कोल्हापूरचे मर्दानी खेळ, नेरूरचे प्रसिद्ध रोंबाट ठरले आकर्षण ; बच्चेकंपनीच्या आकर्षक वेशभूषेने रंगत

कुणाल मांजरेकर

मालवण : गुढीपाडव्या निमित्ताने मालवण मध्ये शनिवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये लाठी – काठी, मर्दानी खेळ आणि पारंपरिक वेशभूषेने रंगत आणली गेली. यावेळी बच्चेकंपनीचा अपूर्व उत्साह पाहायला मिळाला. श्रीमंत योगी मर्दानी आखाडा कोल्हापूरचे मर्दानी खेळ आणि नेरूरच्या प्रसिद्ध रोंबाट नृत्याने स्वागत यात्रेची रंगत अधिकच वाढली होती.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मालवणात मागील १९ वर्षांपासून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. शनिवारी सायंकाळी आमदार वैभव नाईक यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून या नववर्ष स्वागत यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, विजय केनवडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मंदार केणी, विलास हडकर, किरण वाळके, बाबा मोंडकर, उमेश मांजरेकर, भाऊ सामंत, मंदार ओरसकर, अमेय देसाई, शिल्पा परब, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, ललित चव्हाण, राजू बिडये, महेश सारंग, अनिकेत फाटक, रत्नाकर कोळंबकर, अवि सामंत, शेखर गाड, परशुराम पाटकर, अजय शिंदे, तपस्वी मयेकर यांच्यासह राजकिय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या शोभायात्रेत उंट, घोडे, कोल्हापूर येथील मर्दानी खेळ, नेरूरचे प्रसिद्ध रोंबाट, वारकरी भजन, शिवमुद्रा ढोलपथक, आकर्षक चित्ररथ सहभागी झाले. या निमित्ताने बच्चेकंपनीने विविधांगी वेशभूषा केल्या होत्या. दोन वर्षं कोरोना प्रादुर्भावामुळे हिंदू नववर्ष स्वागत यात्रा होऊ शकली नव्हती. मात्र यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सर्वांचा उत्साह पहायला मिळाला. तब्बल साडेतीन तासांहून अधिक वेळ ही शोभायात्रा रंगली होती.

कोल्हापूर येथील श्रीमंत योगी मर्दानी आखाडाच्या कलाकारांनी सादर केलेल्या मर्दानी खेळाने उपस्थितांची वाहवा मिळवली. यामध्ये लहान मुलांनीही चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. तर नेरूरच्या प्रसिद्ध रोंबाट नृत्याने देखील स्वागत यात्रेची रंगत अधिकच वाढली होती. मामा वरेरकर नाट्यगृह येथे या शोभयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी आकर्षक वेशभूषा परिधान करून सहभागी झालेल्या बच्चेकंपनीला आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!