रेवतळेत पडवीला आग ; स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली !

दीपक पाटकर यांची घटनास्थळी धाव ; मदत मिळवून देण्याचा दिला शब्द

आग विझवण्यासाठी डॉ. परुळेकर पती- पत्नीचेही मोलाचे सहकार्य

कुणाल मांजरेकर

मालवण : शहरातील रेवतळे येथे डॉ. हरीश परूळेकर यांच्या दवाखान्या नजीक राहणाऱ्या ममता प्रकाश वायंगणकर यांच्या राहत्या घराला रविवारी सकाळी अचानक आग लागली. यावेळी डॉ. परुळेकर पती- पत्नीसह स्थानिक नागरिकांनी धावाधाव करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, भाजपाचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली. श्रीमती वायंगणकर यांची परिस्थिती हलाखीची असून त्यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दीपक पाटकर यांनी आहे.

रेवतळे येथे डॉ. परुळेकर यांच्या हॉस्पिटल नजीक ममता प्रकाश वायंगणकर या आपल्या मुलासमवेत राहतात. त्यांच्या नवऱ्याचे निधन झाले आहे. आज सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. ही घटना निदर्शनास येतात डॉ. हरिष परुळेकर आणि त्यांच्या पत्नीने तात्काळ धावाधाव करून ही आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीची माहिती नगरपालिकेला दिल्यानंतर पालिकेचे कर्मचारी हेमंत आचरेकर, रमेश कोकरे यांनी येथे येऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे ही आग वेळीच आटोक्यात आली. या आगीत वायंगणकर यांच्या पडवीचे तसेच माडाचे नुकसान झाले आहे. मात्र वेळीच आगीवर नियंत्रण आल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी येथील रहिवासी श्री. राणे यांनी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर श्री. पाटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी या नुकसानीचा उद्या तातडीने पंचनामा करून घेत श्रीमती वायंगणकर यांना मदत मिळवून देण्याची ग्वाही दीपक पाटकर यांनी दिली आहे.

अग्निशमन वाहनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

मालवण नगरपालिकेचे अग्निशमन वाहन जीर्ण झाल्याने निर्लेखीत करण्यात आले आहे. मात्र पालिकेला अद्याप नवीन अग्निशमन गाडी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे शहरात आग लागल्यावर अनेकवेळा अग्निशमन गाडीची कमतरता जाणवून येते. आजही आग लागल्यावर अग्निशमन गाडीची उणीव भासून आली.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!