गणेश कुडाळकर यांचा लेखी राजीनामा अद्याप अप्राप्त ; पण…

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती

कुणाल मांजरेकर

मालवण : शिवसेनेत काम करताना जे सोबत येतील, त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करणे हे आमचे कर्तव्य आहे. याच दृष्टीने पक्षात नवीन कार्यकर्ते येत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे. दरम्यान, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांचा लेखी राजीनामा अद्याप पक्षाकडे प्राप्त झालेला नाही. मात्र त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा. २००५ च्या पूर्वीपासून पक्ष संघटना वाढीसाठी ते प्रामाणिक मेहनत घेत आहेत. शिवसेनेच्या पडत्या काळातही ते भगव्याशी प्रामाणिक राहिले. संघटनेत कोणीही नवीन कार्यकर्ते आले तरी जुन्यांचे महत्व कमी होणार नाही, असे स्पष्टीकरण देखील श्री. खोबरेकर यांनी दिले आहे.

मालवणचे माजी उपनगराध्यक्ष, राणे समर्थक महेश जावकर यांनी अलीकडेच युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रक देऊन महेश जावकर यांच्यासह शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या राणे समर्थकांवर तोफा डागत आपल्या उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सादर केल्याचे म्हटले होते. आज तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या पत्रकार परिषदेवेळी कुडाळकर यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता अद्याप पर्यंत गणेश कुडाळकर यांचा लेखी राजीनामा आमच्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे गणेश कुडाळकर हे आजही आमच्यासाठी शिवसैनिक आहेत. २००५ च्या अगोदर आणि शिवसेनेच्या पडत्या काळातही त्यांनी भगवा ध्वज आपल्या हातामध्ये घेतला होता. त्यामुळे शिवसेना म्हणजे काय ? शिवसेनेत काम कशा पद्धतीने करावे ? हे त्यांना माहिती आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे एखादी बाब आपल्याला खटकत असेल तर ती प्रकट करणे स्वाभाविक गुणधर्म आहे, असे सांगून कोणाच्या येण्याने कुठल्याही कार्यकर्त्यांचे महत्त्व कमी होणार नाही ही ग्वाही आम्ही देतो. आमचे जे जुने सहकारी आहेत, त्यांना डावलण्याचे काम पक्ष संघटनेकडून होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही हरी खोबरेकर यांनी दिली. सत्ता कोणाचीही असली तरी चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या विरोधात आवाज उठवण्याची शिकवण बाळासाहेबांनी दिली आहे. त्यामुळे कुडाळकर यांना कोणाच्याही कार्यपद्धतीबाबत आक्षेप असेल तर त्यांनी रीतसर पक्ष नेतृत्वाकडे यावे. आम्ही सर्व शिवसैनिक माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून पक्षात नवीन आलेल्यांना सोबत घेऊन आणि जुन्यांचा मानसन्मान राखून या ठिकाणी शिवसेना अधिक भक्कमपणे कशी उभी राहील, याकडे आम्ही लक्ष देत असल्याचे हरी खोबरेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!