होममिनिस्टर स्पर्धेत सौ. ममता गुरव ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी
उपविजेत्या स्वरा राठवड यांना सोन्याच्या नथीचा मान ; रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे आयोजन
आचरा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आचरा येथील रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या होममिनिस्टर स्पर्धेत सौ. ममता गुरव या ३२ स्पर्धकांमधून बाजी मारत साईसमर्थ कलेक्शन पुरस्कृत पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत. तर उपविजेत्या पदाचा मान मिळवलेल्या सौ. स्वरा राठवड यांना सी कॅफे पुरस्कृत सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेचे बक्षिस वितरण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी, सरपंच प्रणया टेमकर, वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, अशोक कांबळी, दिपाली कावले, भिकाजी कदम, उंडील तलाठी सौ. सुनिता मेस्त्री, ग्रंथपाल विनिता कांबळी, सांस्कृतिक समितीच्या सौ भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, सौ. वैशाली सांबारी, संतोष गोसावी, सौ. गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
एकूण सहा फेऱ्यांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत प्रत्येक फेरी साठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली होती. सदर बक्षिसे सौ. उर्मिला सांबारी, रचना जोशी, सीमा घुटूकडे, वैशाली सांबारी, स्मिता परब, सुमित्रा गुरव, श्रीमती शोभा सुखटणकर, यशोधन गवस, कुलसुम नर्सरीचे सौरभ राणे, श्रीमती घाडी यांनी प्रायोजित केली होती. उपविजेत्या होममिनिस्टरला सी कॅफे आचराच्या प्रणया टेमकर यांच्या कडून सोन्याची नथ तर विजेत्याला साईसमर्थ कलेक्शनच्या भावना मुणगेकर यांच्याकडून सेमी पैठणी देण्यात आली. या स्पर्धेला उपस्थित स्पर्धकांसाठीही प्रश्न मंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अचूक उत्तरे देणाऱ्या प्रेक्षकांना मानसी राणे, गीता खेडेकर यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. आशिष पेडणेकर आणि सौ. मृणालिनी आचरेकर यांच्याकडून उपस्थितांसाठी अल्पोपहारही देण्यात येणार आला. स्पर्धा यशस्वीतेसाठी वाचनालयाचे महेश बापर्डेकर, स्वप्नील चव्हाण, समृद्धी मेस्त्री, विलास आचरेकर, रुपेश साटम यांनी विशेष परीश्रम घेतले.