ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन ; शिवसेनेवर शोककळा
मुंबई : ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे आज राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी ते ८१ वर्षांचे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी आणि सच्चे शिवसैनिक अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. जानेवारीमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. त्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. शिवसेना पक्ष संघटनेत त्यांची महत्वाची भूमिका राहिली. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर माधव देशपांडे, शाम देशमुख, बळवंत मंत्री हे प्रमुख नेते बाळासाहेबांशी जोडले गेले. पुढे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या दोघांनी शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेबांसोबत मोठं काम केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत शिवसेना नेते म्हणून त्यांनी काम केलं. १९७२ मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. पुढे पदवीधर मतदारसंघाचे पहिले आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि युतीच्या काळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
सुधीर जोशी हे १९६८ साली प्रथम नगरसेवक झाले. मुंबई महानगरपालिका गटनेता, विरोधी पक्षनेता म्हणून ते राहिले. १९७३ मध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौर झाले तेव्हा ते सर्वांत तरुण महापौर होते. १९९२-९३ या दरम्यान ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते होते. तेव्हा त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल निष्कर्ष पुस्तिकेद्वारे शासनाकडे सादर केला. शिवशाही सरकारात ते जून १९९५ ते मे १९९६ या कालखंडात प्रथम महसूल मंत्री होते. नंतर १९९६ ते १९९९ पर्यंत शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत होते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय लोकाभिमुख ठरले.