काँग्रेसचं उद्या नारायण राणेंच्या घरासमोर आंदोलन ?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याचा करणार निषेध
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रा विरोधात केलेल्या कथित वक्तव्यावरून काँग्रेसने आज मुंबईत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर उद्या (मंगळवारी) कणकवलीत भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे उद्या कणकवलीत तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशात कोरोना असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनात केली होती. यामुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याचा आरोप करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. या कारणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याबाहेर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे आज मुंबईत भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण तणावाचे बनले होते. मात्र पोलीस प्रशासनाच्या दक्षतेमुळे परिस्थिती आटोक्यात आली. या घटने पाठोपाठ सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या घरासमोर काँग्रेस मंगळवारी आंदोलन करणार असल्याची माहिती मिळत आहे. उद्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याना कणकवली काँग्रेस कार्यालयात जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे उद्या काँग्रेसचे कार्यकर्ते खरोखरच राणेंच्या निवास्थाना बाहेर जाणार का आणि त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून कोणती प्रतिक्रिया उमटणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.