चुकीच्या नियोजनामुळे बंद पडलेल्या भुयारी गटार योजनेला शिवसेनेच्या कार्यकाळातच चालना

महेश कांदळगावकर यांचे प्रत्युत्तर ; राजन वराडकर यांची कारकीर्द स्वतःच्या पक्षाविरोधात काम करण्यात व्यर्थ्य

मालवण : माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या कार्यकाळात चुकीच्या नियोजनामुळे बंद पडलेली भुयारी गटार योजना आम्ही सत्तेत आल्यानंतर आमच्या आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करत ती सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे ही योजना राबवण्यात अपयशी कोण ठरले होते, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे, अशी टीका माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकातून केली आहे. राजन वराडकर यांची स्वतः निवडून आलेल्या पक्षाच्या विरोधात काम करण्यात आणि विकास कामांना विरोध करण्यात आपली उपनगराध्यक्ष पदाची संपूर्ण कारकीर्द व्यर्थ घालवल्याची टीकाही श्री. कांदळगावकर यांनी केली आहे.

आपल्या सोईप्रमाणे आमदारांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढून स्वतःची पाठ उपाध्यक्षांनी थोपटून घेऊ नये. मागील दोन वर्षापासून कोरोना कालावधीत अडचणीमुळे या कामाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही ही वस्तुतिथी आहे, तरी ही योजना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आता अचानक त्यांच्याच काळातील, मर्जीतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा मुद्दा का आला या मागचे कुठले ‘कारण’ आहे हे पण एक कोडे आहे. आमच्या कालावधीत या ठेकेदाराला दिलेली बिल ही भुयारी गटारसाठी प्राप्त निधीतून दिली आहेत. जर ती चुकीच्या पद्धतीने दिली असेल तर तशी तक्रार शासन दरबारी करा. पण याच वेळी आपल्या कालावधीत याच ठेकेदारांची बिल भुयारी गटारचा निधी नसल्याने कर्मचाऱ्यांच्या राखीव निधीतून कुणाचीही परवानगी न घेता दिली गेली याच मागचे ‘कारण’ पण उपाध्यक्षांनी योग्य ‘अर्थ’ काढून स्पष्ट करावे. आपल्या अर्थकारणाला आमच्या कालावधीत चाप बसल्याने आपण वारंवार विकास कामात अडथळा आणत आहात.
पालिकेचा इमारत परिसर सुशोभीकरण करताना केलेल्या प्लॅनमधील आपल्या दगडी कुंपणाच्या बाजूने जाणारा अंतर्गत रस्ता अन्य ठिकाणाहून नेण्यात यावा अशी पालिकेला नेहमी सहकार्य करणारे लगतचे कब्जेदार जोशी यांनी विनंती केल्यामुळे तो रस्ता रद्द करण्यात आला. पालिकेच्या अंतर्गत रस्त्यामुळे आमचा फायदा झाला हा कुठला जावईशोध लावला हे कायम फायदा बघणारे उपाध्यक्ष आणि कुशेच सांगू शकतील. आमच्या फायद्याचे टेंडर मंजूर केले असे ते म्हणत असतील तर हे टेंडर १० टक्के कमी दराने मंजूर केले याची पण माहिती घ्यावी. आपल्या मर्जीतील ठेकेदाराला हे टेंडर न मिळाल्याने आणि जे टेंडर आम्ही मंजूर केले ते १० टक्के कमी दराचे असल्याने या ठेकेदाराला त्रास देण्याच्या दृष्टीने असे खोटे नाटे आरोप या द्वयीकडून होत आहेत. आपली सकारात्मक वृत्ती असती तर या सुशोभीकरण प्लॅन बद्दल आपणास पूर्व माहिती पण दिली असती. पण आपण फक्त विरोधाला विरोध आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पाच वर्षे पालिकेत शहराच्या विकासाला खीळ घालण्याचे काम केले आहे, अशी टीका त्यांनी माजी उपनगराध्यक्ष श्री. वराडकर यांच्यावर केली आहे.

मालवणच्या क्रीडापटूसाठी साईमंदिर नजीक सिंधुदुर्ग कॉलेजकडून ९९ वर्षासाठी लीज वर घेतलेल्या जागेतील स्पोर्ट्स कॉम्लेक्स मधील स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन हॉलचे काम बंद पाडून खेळाडूचे नुकसान करण्याचे काम केल्याचा आरोपही श्री. कांदळगावकर यांनी या द्वयीवर केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!