आधारकार्ड शिबिरातून मिळालं समाधान आणि आपुलकीची वागणूक !
आप्पा लुडबे यांच्यावतीने आयोजित आधारकार्ड शिबिराचा ७८ जणांना लाभ
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण शहरात आधारकार्ड नोंदणी आणि अपडेट प्रक्रिया जटील बनली असताना भाजपचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी स्वतःच्या निवासस्थानी आधार नोंदणी आणि अपडेट शिबीर आयोजित करून शहर वासीयांना सुलभ सेवा उपलब्ध करून दिली. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात घेण्यात आलेल्या या शिबिराचा ७८ जणांनी लाभ घेतला. या शिबिरातून समाधान आणि आपुलकीची वागणूक मिळाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
मालवण शहरात आधारकार्ड दुरुस्तीसाठी चार ते पाच वेळा नंबर लावावा लागतो. नंबर लागल्यावर देखील येथील कर्मचाऱ्यांची वागणूक समाधानकारक नसल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवस आधारकार्ड नोंदणी आणि अपडेट शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचा ७८ जणांनी लाभ घेतला. इतर ठिकाणी आम्ही चार पाच वेळा नंबर लावला, परंतू आमचे काम झाले नाही. उलट या ठिकाणी आमचे कामही झाले आणि आपुलकीची वागणूकही मिळाली, याच समाधान मिळालं, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रतिक्रिया ऐकून हे शिबीर खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे समाधान वाटल्याची प्रतिक्रिया आप्पा लुडबे यांनी व्यक्त केली आहे.