रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेन्ट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी)
१०० वर्षांहून अधिक काळाची सेवेची परंपरा असलेला रोटरी क्लब हा जागतिक स्तरावरील एक मोठं संघटन आहे. क्लबचे काम हे अत्यंत आनंददायी असून यामध्ये केवळ बिझनेस वाढ हा उद्देश नसून क्लब सदस्यातील मैत्रिभाव आणि समाजातील वंचित घटकांना सेवा देणे हा कर्तव्यभाव आहे. रोटरी सदस्यांनी प्रथम आपलं घर संसार प्रकाशित करावा, व्यक्तिगत जीवन आनंददायी करावे आणि मग समाजासाठी उचित काम करावे. असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नॉमिनी रो.नासीर बोरसादवाला यांनी व्यक्त केले.

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेन्ट्रलचा पदग्रहण सोहळा शरद कृषी भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सन २०२१-२२ च्या नवीन कार्यकारिणीने पदग्रहण केले. क्लबचे प्रेसिडेंट म्हणून रो.डॉ प्रशांत कोलते, सेक्रेटरी म्हणून रो.उदय जांभवडेकर, तर ट्रेझरर म्हणून रो.नवीन बांदेकर यांनी जबाबदारी स्वीकारली. जिल्ह्यातील हा आठवा रोटरी क्लब असून या क्लबच्या स्थापनेला केवळ सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. तरीही क्लबने शिक्षण,आरोग्य, पर्यावरण या विषयात अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविलेले आहेत. या उपक्रम आणि क्लबच्या एकूण दमदार कामगिरीबद्दल उपस्थित रोटरी मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी रो बोरसादवाला यांच्यासमवेत असिस्टंट गव्हर्नर रो शशिकांत चव्हाण, रो राजेश घाटवळ, क्लबचे जीएसआर रो गजानन कांदळगावकर, ओरोस सरपंचा सौ प्रीती देसाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नेहा कशाळीकर यांच्या सुश्राव्य गणेशवंदनेने करण्यात आली. तर प्रास्ताविक रो शंकरराव कोकितकर, तर सूत्रसंचालन रो प्रभाकर सावंत, रो सचिन मदने यांनी केले. यावेळी क्लबतर्फे विविध अवार्डस प्रदान करण्यात आली. व्होकेशनल एक्सलेन्स अवार्ड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती शेखर सावंत यांना प्रदान करण्यात आले. तर व्होकेशनल अवार्ड शोषित मुक्ती अभियानाचे उदय आईर, सामाजिक कार्यकर्ते नागेश ओरोसकर, युवा उद्योजक दिनेश जैतापकर, आणि जेष्ठ शिक्षक,लेखन आणि विचारवंत जुवाव फर्नांडिस या चौघा मान्यवरांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात शालांत परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या रोटरी सदस्यांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. सानिया सावंत, धैर्य बागवे, सुजल चव्हाण, प्रजोल आळवे, खुशी मालणकर, अथर्व मसुरकर, अनुजा सावंत याना भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. रोटरी कोविड योद्धा पुरस्काराने डॉ दर्शना कोलते यांना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला जिल्ह्यातील विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. क्लबचे जेष्ठ सदस्य रो शंकरराव कोकितकर यांचा ६५ वा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी रो डॉ प्रशांत कोलते, रो शशिकांत चव्हाण, रो राजेश घाटवळ, रो गजानन कांदळगावकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.प्रशांत कोलते यांनी मार्चपासून केलेल्या उपक्रमांबद्दल माहीती दिली. मार्चपासून जूनपर्यंत ओरोस ग्रंथालयाला पुस्तके वितरण, आनंदाश्रय अणाव येथे वृद्धांची तपासणी व औषधे वाटप, कोविड लसीकरण मार्गदर्शन कार्यशाळा, क्षयरोग दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर, कोविड रुग्णांसाठी होम आयसोलेशन माॅनिटरींग किट तसेच ऑक्सिजन कान्सेन्ट्रेटर असे उपक्रम केले. जुलैपासून सुरू झालेल्या नवीन वर्षांत ही विविध उपक्रमांची सुरुवात केलेली आहे. वृक्षारोपण, डॉक्टरांचा सन्मान, पोस्ट कोविड केअर, गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार, आनंदाश्रय येथील कोरोनाग्रस्त निराधार वृद्धांची तपासणी, उपचार व साहीत्य वाटप, जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विविध उपक्रम, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कुक्कुटपालन प्रशिक्षण व पक्षी वितरण असे उपक्रम केले आहेत. भविष्यात महिला सबलीकरण, आरोग्य साक्षरता, कॅटॅरॅक्ट कॅम्प, ब्लड बॅंक व डोनेशन कॅम्प, निराधारांना आधार, कॅन्सर अवेअरनेस करीअर मार्गदर्शन, नेत्रतपासणी शिबिर असे उपक्रम करणार असल्याचे अध्यक्ष रो. डाॅ.प्रशांत कोलते यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!